धाराशिव जिल्ह्यातील विकासाचं घोडं कधी रेसमध्ये धावणार हे कोणालाच माहिती नाही, पण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मात्र पुन्हा एकदा घोषणांचा फुलटॉस टाकला आहे! यावेळी मुद्दा आहे रामलिंग तीर्थक्षेत्राचा. “मराठवाड्याचं माथेरान” होईल अशी थाटामाटात घोषणा त्यांनी केली, पण या आधी ज्या घोषणा झाल्या, त्या प्रत्यक्षात दिसल्या आहेत का, हाच प्रश्न जनतेला पडला आहे.
घोषणांचा उगम आणि विकासाचा गहाणधारक
२००९ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या आमदार पाटील यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नाला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. कार्यकर्ते रोज सोशल मीडियावर ‘भावी पालकमंत्री’ म्हणून ट्रेंड चालवतात, पण मंत्रिपद हाताशी येत नाही, तसं विकासही धड साध्य होत नाही. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास, एम्स मेडिकल कॉलेज, धाराशिव शहरातील रस्ते… यापैकी काहीच पूर्ण झालेलं नाही. मग रामलिंगचा माथेरान कसं काय होणार?
फोटोशॉपच्या दुनियेतच विकास!
रामलिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ३D मॉडेल्स, छान छान फोटो, भारी व्हिडीओ तयार झालेत. पण प्रत्यक्षात एक वीटही हललेली नाही. आई तुळजाभवानीच्या तुळजापूरचा तिरुपतीसारखा विकास करण्याच्या गप्पा गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहेत. आता माथेरानसारखा विकास करण्याची संकल्पना आणली आहे. पण अंमलबजावणी शून्य !
धाराशिवच्या हातलादेवी तलावात गायब कारंजे!
धाराशिवच्या हातलादेवी तलावात जिल्हा परिषदेच्या निधीतून 90 लाख रुपये खर्च करून संगीत कारंजे उभे राहणार होते, असं आश्वासन दिलं होतं. पण निधी गायब झाला, आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांना फक्त सांगाडा दिसला , कारंजे मात्र कुणाला दिसले नाहीत ! एक प्रकारे, निधीचा ‘विकास’ कागदावरच झाला, फक्त त्याचा प्रत्यक्ष अनुभव कुणाला मिळालेला नाही.
गावचं राजकारण आणि जिल्ह्याचा बळी
राणा पाटील आणि त्यांचे चुलतभाऊ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील वैर सगळ्या जिल्ह्याला महागात पडलंय. एकमेकांवर आरोप करूनच दोघे निवडणूक जिंकतात, आणि जनता मात्र विकासाच्या प्रतीक्षेत बसलेली असते. रस्त्यांची कामे का थांबली? तर “त्यांनीच अडवलं!” अशी कारणं दिली जातात.
म्हणजे नेमकं काय होणार?
रामलिंगचा माथेरान कागदावर, सोशल मीडियावर आणि घोषणांमध्ये मात्र ‘टॉप क्लास’ दिसेल. पण प्रत्यक्षात, ते मृगजळ ठरेल, हे पक्कं! जिल्ह्यातील मागासलेपण अजूनही कायम आहे आणि नवा प्रकल्प सुरू होण्याआधीच तो घोषणांच्या फाइलमध्येच राहील, असं चित्र आहे.
जनतेला वेडं बनवण्याचं मिशन कायम!
रामलिंगचं माथेरान होईल का? होईल, पण थ्रीडी मॉडेल्स आणि सोशल मीडिया पोस्टमध्येच! जबरदस्त मार्केटिंग आणि घोषणांचा फुलोरा सोडला, की जनता काही दिवस खूश राहते. पण विकासाचा पत्ता लागत नाही. आणि पाच वर्षांनी हेच नेते नवीन घोषणा घेऊन येतात…
तर मंडळी, पुढच्या घोषणेपर्यंत वाट पाहा आणि ‘भावी पालकमंत्री’ ट्रेंडला लाईक करा!