धाराशिव – जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. लोहारा आणि भूम येथे भाजपच्या संघटन बैठकांना जोरदार सुरुवात झाली, आणि यासाठी छत्रपती संभाजीनगरहून थेट दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांची हजेरी लागली. मात्र, भाजपच्या या बैठकीत जिल्ह्यातील दोन मोठे नेते दिसलेच नाहीत—आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपमध्ये नव्याने आलेले माजी आमदार बसवराज पाटील यांनी थेट दांडीच मारली.
बडे नेते आले तरच… नाहीतर ‘स्वतःला बडे’ समजा!
या दोघांची गैरहजेरी काही नवीन नाही. भाजपचा बडा नेता जिल्ह्यात आल्याशिवाय ही दोघं दौऱ्यात हजेरी लावत नाहीत, आणि मोठा नेता नसेल तर स्वतःलाच मोठं समजून दौऱ्यापासून लांब राहतात. अर्थात, यामागे काही गंभीर राजकीय भावना असल्याचं बोललं जात आहे.
राणा पाटलांची पालकमंत्री पदाची स्वप्नं अद्याप अपूर्ण!
राणा पाटील यांच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणजे मंत्री पद न मिळणे. धाराशिवच्या पालकमंत्री पदावर आपलं नाव लागावं, अशी त्यांची इच्छा अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे मंत्र्यांसमोर हजेरी लावण्याऐवजी ते गुपचूप वेटिंग लिस्टमध्ये बसले आहेत.
बसवराज पाटील – भाजपचा ‘शरणार्थी’ नेता?
तर दुसरीकडे, काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील अजूनही पक्षात रुळलेले नाहीत. त्यामुळे बैठकीला हजर राहून ‘मी भाजपवाला आहे’ असं जाहीर करणं त्यांना कठीण जातंय.
जय श्रीराम Vs शरणार्थी!
भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांची एक सवय असते—कोणी भेटलं की ‘जय श्रीराम’ म्हणायचं. मात्र, भाजपमधील ह्या दोन नेत्यांच्या बाबतीत वेगळीच गंमत आहे.
- राणा पाटील कोणाला भेटले की नमस्कार करतात, ‘जय श्रीराम’ म्हणण्याची त्यांच्या गळ्यातून आवाज येत नाही!
- तर बसवराज पाटील थेट कन्नडमध्ये ‘शरणार्थी’ म्हणतात!
भाजपच्या या दोन्ही नेत्यांचे पक्षात ‘सेटलमेंट’ अजूनही सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीच्या रणधुमाळीत ही जोडी भाजपला फायद्याची ठरेल की त्रासदायक, हे बघणं रंजक ठरणार आहे!