तुळजापूर – तुळजापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढत असून, आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी ‘हलगी वाजवा’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.
आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष; रुग्णांच्या जीवाशी खेळ
संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर मुंबई कौन्सिलची परवानगी नसतानाही मोठी क्लिनिक चालवत आहेत. ग्रामीण भागातील निष्पाप रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून, काही डॉक्टर कोरोनासारख्या आजारांवरही भोंदू उपाय करून मोठी लूट करत होते. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, काही डॉक्टर वैद्यकीय पदवीचा गैरवापर करत असल्याचे आढळले आहे. रुग्णांना योग्य औषधोपचार मिळत नाहीत, हॉस्पिटलमध्येच औषध विक्री केली जाते, हे प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे, या बोगस डॉक्टरांना आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांचेही संरक्षण मिळत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कारवाईबाबत प्रशासन उदासीन; हलगी वाजवून जागे करणार
संघटनेने बोगस डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्रे, पदवी, मुंबई कौन्सिलिंग परवाना आणि औषध विक्री परवाना तपासावा आणि दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, अनेक वर्षे निवेदने देऊन आणि आंदोलने करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने आता हलगी वाजवून अधिकाऱ्यांना जागे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
17 फेब्रुवारी रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असून, कारवाई होत नाही तोपर्यंत ‘टाळे ठोको’ आंदोलनही करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आंदोलनामुळे आरोग्य यंत्रणा जागी होते की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.