धाराशीव – उमरगा-लातूर रोडवरील नारंगवाडी पाटीजवळ भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत शिवसेना (उबाठा) गटाचे वरिष्ठ नेते बाबा पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. लातूरकडून येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH-06 AG 8904 ने उमरग्याकडून लातूरकडे जाणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक MH-25 AW 0099 ला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे इनोव्हा कारचा चक्काचूर झाला असून, पिकअप वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- बाबा पाटील (वरिष्ठ नेते, शिवसेना उबाठा)
- अजय सिद्राम जमादार (वय ४०, कराळी)
- शंकर अप्पाराव लवटे (वय ५५, कराळी)
- शंकर माणीक जमादार (वय ४०, कराळी)
- धनराज वडदरे (वय ४५, कराळी)
- विठ्ठल निवृत्ती माने (वय ५५, मदनेवाडी)
अपघातानंतर घटनास्थळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजधामची रुग्णवाहिका तातडीने पोहोचली. चालक शेषेराव लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जखमींना विश्वेकर हॉस्पिटल, उमरगा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच किशोर सांगवे, वैजनाथ काळे, आण्णासाहेब पवार, प्रदीप सांगवे, गोपाळ औरादे, महेश शिंदे, विठ्ठल चिकुंद्रे, अमोल चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य केले.
सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिक तपास उमरगा पोलिस करत आहेत.