तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असतानाच एक चित्तथरारक घटना घडली. घाटशिर रोडवरील रेड कार पार्किंगमध्ये उभी असलेली स्विफ्ट डिझायर कार अचानक पेट घेत बघता बघता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले, आणि संपूर्ण कार जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. खाजगी पाणी टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत कारचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले होते.
कार कोणाची आणि आग कशामुळे लागली?
या जळून खाक झालेल्या कारचा मालक गणेश पटाडे (रा. निलगव्हाण, ता. मालेगाव, जि. नाशिक) असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी गाडी जास्त प्रवास झाल्याने गरम झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दर्शनासाठी गाडी पार्क करून बाहेर पडलेले भाविक काही समजण्याच्या आतच ही दुर्घटना घडली.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अरुण शिरगिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आग विझवण्यासाठी मदत मिळवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कार पार्किंग व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुळजापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Video