धाराशिव : सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे व मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनिषा राखुंडे व शिलावती देशमुख यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षण योध्दा श्री. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (दि.२४) अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषण सुरू केले आहे.शासनाने आजतागायत या उपोषणाची दखल घेतलेली नाही.त्यामुळे श्री. जरांगे यांना समर्थन देण्यासाठी व सकल मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदारांच्या यांच्या प्रतिमेचा जाळल्या
धाराशिव – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तर सरकारने सातत्याने हे आरक्षण देण्यासाठी मुदत वाढ हे धोरण अवलंबले आहे. तसेच आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या आरक्षणासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी समर्थन देणाऱ्या आमदार कैलास पाटील यांच्यासह इतर आमदारांना अटक केली आहे. त्यामुळे या सरकारच्या कृतीचा मराठा आंदोलकांनी जाहीर निषेध केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रतिमांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आग लावून जाळून या सरकारचा व सर्वपक्षीय बैठकीतील नेते मंडळींसह सर्व आमदारांचा जाहीर निषेध केला.
संकेत सुर्यवंशी, अभिजीत देशमुख, धर्मा सुर्यवंशी, निलेश साळुंके, धैर्यशील सस्ते, बंडू आदरकर, अक्षय नाईकवाडी, अमोल जाधव, अण्णा यादव, वैभवी आकाश मुगळे, पंकज पाटील, अमोल शिरसाट आदींसह इतर मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
मराठा आरक्षण : वडगाव (सि.) मध्ये कॅन्डल मार्च
वडगाव (सि.) – मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे – पाटील यांचे अमरण उपोषण आठव्या दिवशीही सुरुच आहे. शासन मराठा आरक्षण देण्यास वेळकाढू पणा करीत आहे. शासनास साडी,चोळी, बांगड्या पाठवून शासनाच्या या कृतीचा वडगाव (सि.) येथे मराठा आंदोलकाच्या वतीने निषेध करण्यात आला. मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे – पाटील यांचे अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील वडगाव (सि.) येथे साखळी उपोषण सुरु आहे.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, सरसकट मराठा बांधवाना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे – पाटील हे अंतरवली, सराटी येथे २५ ऑक्टोबर पासून अमरण उपोषणास बसले आहेत. सरकार मराठा आरक्षण देण्यास वेळकाढू पणा करीत आहे. मनोज जरांगे – पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारच्या वेळकाढूचा निषेध करण्यासाठी आंदोलकाच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठ्याकडे साडी, चोळी, बांगड्या देवून शासनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलकाच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मरोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे.तत्पुर्वी रात्री गडगाव (सि.) मध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी या कॅन्डल मार्चमध्ये महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील प्रमुख मार्गावरुन हा वँâडल मार्च काढण्यात आला.