रस्ते म्हणजे केवळ प्रवासाची साधने नाहीत, तर विकासाची नाळ असतात. हे रस्ते चांगले असले की गाव, शहरं, अर्थव्यवस्था आणि जीवनमानही उन्नत होतं. पण काही दलाल मात्र हे समजण्याच्या पलीकडे आहेत. नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचं भलं व्हायला हवं होतं, पण काहींना त्यातून आपलं दलालीचं गणित बसवायचं होतं!
रस्त्याचं स्वप्न आणि दलालांचा अडथळा
नळदुर्ग-अक्कलकोट हा केवळ ३२ किलोमीटरचा रस्ता. पूर्वी हा चार पदरी राष्ट्रीय महामार्ग होणार होता. सोलापूर हद्दीतील २१ किलोमीटरचा भाग फक्कड तयार झाला, पण धाराशिव हद्दीतील ११ किलोमीटर मात्र दलालीच्या राजकारणात अडकला.
शेतकऱ्यांचं नाव पुढे करून काहींनी आंदोलनाची नौटंकी केली, न्यायालयात जाऊन प्रकरण लटकवलं, आणि अखेर राष्ट्रीय महामार्गच रद्द झाला! आता चार पदरी महामार्गाऐवजी जुन्या १२ मीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा निर्णय झाला. पण हे सुध्दा काही लोकांना खपत नव्हतं. विकासाचं नाव घेत हवे तेव्हा आंदोलन करणाऱ्या यांना जनतेच्या सोयीपेक्षा स्वतःच्या दलालीचं जास्त महत्त्व!
लोकांचा जीव गेला, पण दलालांना त्याचं काय?
या रस्त्यावर दरवर्षी अनेक अपघात झाले. काहींनी आपले प्राण गमावले, अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. पण या दलालांना ना त्या मृतांचा त्रास, ना त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाची जाणीव! उलट, रस्ता पूर्ण झाल्यास आपल्या दलालीला लगाम बसेल या भीतीने ते विरोध करत बसले.
हा रस्ता अनेक गावांतील लोकांसाठी आवश्यक आहे. लोक नळदुर्गला बाजारहाट करण्यासाठी, मुले शाळा-कॉलेजसाठी येतात. हा रस्ता तयार झाल्यास तुळजापूरच्या भवानीमातेचे दर्शन घेऊन भाविक केवळ एक तासाच्या आत नळदुर्गमार्गे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊ शकतील.
“धाराशिव लाइव्ह”चा संघर्ष आणि दलालांचा बाजार उठवला!
या प्रकारावर ‘धाराशिव लाइव्ह’ ने सातत्याने आवाज उठवला. दलालांची पोलखोल केली, सत्य समोर आणलं, आणि अखेर प्रशासन हललं. आता हे रस्त्याचं काम सुरू झालंय, पण अजूनही काही उपटसूंभ अडथळे आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
प्रशासनाला स्पष्ट इशारा – दलालांवर गुन्हे दाखल करा!
ह्या सगळ्या प्रकारावर आता प्रशासनाने कडक भूमिका घ्यायला हवी. कोणताही दलाल किंवा स्वार्थी गट या रस्त्याला अडवण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करायला हवेत.
“हा रस्ता विकासाचा मार्ग आहे, दलालांचा व्यापार नाही!”
लोकांचा जीव, विकासाची गरज आणि प्रवासातील सोय ही कोणत्याही दलालीपेक्षा मोठी आहे. हा रस्ता पूर्ण होईलच आणि विकासाच्या प्रवाहात अडथळा आणणाऱ्या दलालांना बाजूला करण्याची वेळ आली आहे!