अणदूर – वळसंग ते चिवरी या ४०० के.व्ही. टॉवर प्रकल्पात लाचखोरीच्या आरोपांनी मोठा वाद निर्माण केला होता. धाराशिव LIVE ने या प्रकरणाचा ‘शॉर्ट सर्किट’ खुलासा केल्यानंतर आता नळदुर्ग पोलिसांनी लाच प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करून घेतली आहे.
गाव पुढाऱ्याच्या ‘बिजली माफिया’ कारभाराला धक्का
या प्रकरणात गावातील एका पुढाऱ्यावर गंभीर आरोप होते. “एक लाख माझा, एक लाख त्याचा आणि शेतकऱ्यांचा काय? – वीजेचा धक्का!” असा सरळ गणिती व्यवहार मांडण्यात आला होता. बी.एन.सी. पॉवर प्रोजेक्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीचा ऑडिओ पुरावा पोलिसांकडे सादर केल्यानंतर अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
तक्रार दाखल – आता पुढे काय?
कंत्रादारास दमदाटी , धमकी देऊन प्रति टॉवर्स दोन लाखाची खंडणी मागण्यात आली आहे. नळदुर्ग पोलिसांनी तिघांविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलीस आता खंडणीचा गुन्हा दाखल करणार का ? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आरोपींवर त्वरित अटक होणार का? की या प्रकरणालाही ‘लोडशेडिंग’ देण्यात येणार?
धाराशिव LIVE लवकरच आणणार ‘पॉवरफुल’ खुलासा!
या प्रकरणातील ‘आका’ आणि ‘बोका’ कोण? हे लवकरच उघड होईल! धाराशिव LIVE लवकरच या टॉवर गडबडीचा मोठा पर्दाफाश करणार आहे. तोपर्यंत गावकऱ्यांनी ‘बिजली गई’ म्हणू नये, कारण येथे वीज येण्यापूर्वीच ‘करंट’ आलाय!