अक्कलकोट तालुक्यातील वळसंग ते तुळजापूर तालुक्यातील चिवरी दरम्यान सुरू असलेल्या ४०० केव्ही विजेच्या टॉवर्सच्या कामावरून अणदूर गावात राजकीय नाट्य रंगले आहे. विकासाच्या नावावर आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यावर काही स्थानिक पुढारी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार करत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मोबदल्यावर डल्ला मारत, या पुढाऱ्यांनी आता उघड उघड ब्लॅकमेलिंगचे उद्योग सुरू केले आहेत.
‘कमिशन’ संस्कृती आणि राजकीय दलाली
अणदूर गावातील माजी सरपंच आणि एक माजी सदस्य यांनी कंपनीकडून प्रत्येकी एक लाख, असे दोन लाख रुपयांचे कमिशन मागितले आहे. एवढेच नाही, तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर देखील हे लोक आपल्या खोट्या आश्वासनांचे जाळे विणत आहेत. एका टॉवरला दहा लाख रुपये मिळवून देण्याचे भाकडकथन करून, हे दलाल शेतकऱ्यांना भडकवत आहेत.
शेतकऱ्याकडून अडवणूक झाल्यास कंपनी पोलीस बंदोबस्तात काम करून, सरकारी दराप्रमाणे बागायती जमिनीसाठी ८० हजार आणि जिरायती जमिनीसाठी ४० हजार रुपये इतकाच मोबदला मिळू शकतो, हे स्पष्ट असतानाही खोट्या आकड्यांची जाहिरातबाजी केली जात आहे. तरीही कंपनी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मोबदला देत आहे.
ब्लॅकमेलिंगचा डाव – पोलिस ठाण्यापर्यंत!
याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे तक्रारीसोबत कमिशन मागितल्याचे पुरावेही जोडले आहेत. पण या प्रकरणाचा शेवट काय होणार? शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोण पुढे येणार? हा खरा प्रश्न आहे.
शेतकऱ्यांनी ठगगिरीला फाटा द्यावा!
गावगुंड, राजकीय दलाल आणि कथित पुढारी हे शेतकऱ्यांचे तारणहार नव्हेत. उलट त्यांच्या जमिनींवर तेच सौदेबाजी करत आहेत. आज एक विशेष खाजगी कंपनी हे टॉवर्स उभारत आहे, उद्या आणखी कोणी येईल. पण जर शेतकऱ्यांनी अशा लोकांना थारा दिला, तर त्यांच्या हक्काचे पैसेदेखील त्यांच्या हातात पडणार नाहीत.
शेतकरी हे गावकऱ्यांसाठी ‘विकास’ म्हणजे नेमके काय, हे ओळखणारे असतात. त्यामुळे कोणाचे ऐकायचे आणि कोणाला फाट्यावर मारायचे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. अन्यथा, आपल्या जमिनीवरच परके हक्क गाजवतील आणि आपल्यालाच रिकाम्या हाताने उभे राहावे लागेल. जमिनीचा सौदा हा पारदर्शक असावा, ‘दलाली’च्या वसाहतीला मोकळीक मिळता कामा नये!