तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे विजेच्या टॉवर्सच्या उभारणीवरून मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. एका माजी सरपंचाने मोठ्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने ५४ लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या लाच मागणीचा ऑडिओ व्हायरल झाल्याने अणदूर – नळदुर्ग परिसरात खळबळ उडाली आहे.
४०० केव्ही विजेच्या टॉवर्ससाठी ५४ लाखांची लाच मागणी
वळसंग ते चिवरी या मार्गावर ४०० केव्ही क्षमतेच्या विजेचे टॉवर्स उभारण्याचे काम सुरू आहे. एकूण २७ टॉवर्ससाठी प्रत्येकी एक ते दोन गुंठे जागेची आवश्यकता आहे. या प्रकल्पासाठी जबाबदारी असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माजी सरपंचाने प्रत्येकी दोन लाख रुपये लाच मागितली. म्हणजेच, संपूर्ण २७ टॉवर्ससाठी तब्बल ५४ लाख रुपये उकळण्याचा कट रचला गेला होता.
“एक लाख माझ्यासाठी, एक लाख माझ्या सहकाऱ्यासाठी”
काम सुरू राहावे असे वाटत असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा काम बंद पाडले जाईल, अशी थेट धमकी देण्यात आली. हा संवाद एका ठेकेदाराने रेकॉर्ड करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला. ऑडिओ व्हायरल होताच धाराशिव लाइव्हने या प्रकाराचा पर्दाफाश केला आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव
या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण भागात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला कंपनीकडून लाच मागून काम अडवले जात आहे. या दुपटी भूमिकेमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. आता पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संबंधित भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पवनचक्की आणि विजेच्या टॉवर्समध्ये फरक
अनेक लोक सध्या पवनचक्की प्रकल्पाला विरोध करत आहेत. मात्र, विजेच्या टॉवर्सचे काम हा सरकारी प्रकल्प असल्याने कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होणारच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुरट्या पुढाऱ्यांच्या जाळ्यात न अडकता थेट कंपनीबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा. जर कोणी जबरदस्तीने अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर शासन जमीन संपादन करूनही प्रकल्प पूर्ण करणार आहे.