नेतृत्व हे केवळ पदाने प्राप्त होत नाही, तर ते व्यक्तीच्या कार्यशक्तीने आणि लोकसंग्रहाने सिध्द होते. याचाच जिवंत आदर्श म्हणजे आमचे नेते आणि दिलदार मित्र, कैलास पाटील. एक कार्यकर्ता म्हणून सुरू झालेली त्यांची वाटचाल आज यशस्वी नेतृत्वाच्या शिखरावर पोहोचली आहे.
कैलास दादांशी माझा राजकीय प्रवास सुरू झाला, तेव्हा त्यांचा एक सक्षम कार्यकर्ता म्हणून असलेला उत्साह आणि लोकांसाठी झिजण्याची वृत्ती मला विशेष भावली. त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य आणि सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्याची तळमळ पाहूनच त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची कल्पना मला तेव्हाच आली होती. जनतेच्या हितासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आणि सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात.
मी त्यांच्या सोबत असताना, त्यांनी मला एका संघटनेत घेतले. पुढे काही कारणास्तव मला ती संघटना सोडावी लागली, पण कैलास दादा मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या स्वाभिमानी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे मला हे ठाम ठाऊक होते की, ते नक्कीच योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. आणि तसेच झाले! योग्य संधी आल्यावर त्याच संघटनेत प्रवेश करत, त्यांनी नेतृत्वाची नवी दिशा निर्माण केली. त्यांच्यातील दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि निर्णयक्षमतेमुळे ओमदादांनी त्यांना योग्य संधी दिली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले.
त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाप्रमुख आणि पुढे आमदारकीपर्यंत मजल मारली. पहिल्या टप्प्यात सत्तेतील अडीच वर्ष आणि त्यातही कोविडच्या कठीण काळात त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा प्रत्यय दिला. जिल्ह्याच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करून त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. प्रथमच निवडून येणे सोपे असते, पण दुसऱ्यांदा जनतेने पुन्हा संधी दिली तर ते नेतृत्व त्या पदाला न्याय देते, असे मानले जाते. कैलास दादा या अपेक्षांवर पूर्णतः खरे उतरले.
त्यांचे नेतृत्व फुलत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील जिवंत कार्यकर्ता. संघटनेच्या मजबुतीसाठी ते अहोरात्र मेहनत घेत राहतात आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या या नेतृत्वगुणांमुळेच त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा समुदाय आहे आणि मित्रमंडळीही त्यांच्या सोबत ठाम उभी आहेत. कारण कैलास दादा मैत्री जपणारे, आपुलकीने नाती जपणारे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आत्मीयतेने सांभाळणारे आहेत. म्हणूनच ते सर्वांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करू शकले आहेत.
त्यांचे हे साधे आणि स्वाभिमानी जगणे, यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवण्याची त्यांची वृत्ती आणि लोकसेवेचे व्रत हे नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वाचा विस्तार अधिकाधिक वाढत जावो आणि ते जनतेच्या सेवेसाठी असेच अविरत कार्य करत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आ. कैलास दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .
– पंकज जयंतराव पाटील