बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. सकल धाराशिव समाजाच्या आवाहनानंतर जिल्हा व्यापारी महासंघानेही या बंदला पाठिंबा दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो वृत्तवाहिन्या, न्यूज वेबसाइट आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. फोटो पाहून अनेक लोक संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत आणि या राक्षसी कृत्याचा निषेध करीत आहेत.
बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
आजच्या बंदला जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
सर्व आरोपींना फाशीची मागणी
या हत्येच्या निषेधार्थ सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
बंद शांततेत पार पडण्याची अपेक्षा


बंद दरम्यान कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता
या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बंदमुळे बाजारपेठा ओस पडल्या असून, रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.