येरमाळा : येरमाळा पोलिसांनी धाराशिवकडे जाणाऱ्या मार्गावर उपळाई पाटीजवळ गोवंश तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत २५ गोवंशीय जनावरे, दोन वाहने आणि एकूण ६.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख दस्तगीर शेख (वय २८, रा. शेख वस्ती, भिगवन, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि तौसिफ शेख हे दोघे दिनांक १० मार्च २०२५ रोजी पहाटे २.३० वाजता येरमाळा ते धाराशिव मार्गावर पिकअप क्रमांक एमएच ४२ एक्यु ०२९२ आणि एमएच ११ बीएल ४२०९ या दोन वाहनांमध्ये २५ जर्सी गायी आणि वासरांची निर्दयतेने वाहतूक करत होते. जनावरांना आखूड दोरींनी घट्ट बांधून त्यांना हालचाल करण्यास मर्यादा घातल्या होत्या तसेच त्यांच्या अन्न-पाण्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
येरमाळा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना अटक केली आणि जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ३, ११(१) (डी) (एफ) (एच) (के), तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(अ)(१)(२), ५(ब), मोटार वाहन कायदा ११९, ८३/१७७, १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.या कारवाईमुळे अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.