परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणावर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेचा तपशील
परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे ३ मार्च रोजी दुधोडी (ता. भूम) येथील माऊली गिरी (१८) या तरुणावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी माऊली गिनी याला गंभीर जखमी करून मृत समजून पांढरेवाडी ते कोथरुळ रस्त्यावर फेकून दिले. नातेवाईकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात हलवले असून, त्याच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
चार आरोपी अटकेत, सात आरोपी फरार
या प्रकरणी अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सतीश जगताप (रा. पांढरेवाडी), राहुल मोहिते (रा. पांढरेवाडी,), आकाश मगर (रा. शेळगाव,) आणि विजय पाटील (रा. सोनारी ) यांना अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्य सात आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
तपास सुरू
या घटनेबाबत माऊली गिरी याच्या वडिलांनी अंबी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष खरड आणि पीएसआय ज्ञानेश्वर घाटगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.