धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर आळा घालण्यासाठी आता सहा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.
रुग्णालयात गुंडगिरी थांबवण्यासाठी कठोर पावले
गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात परिचारिका, डॉक्टर आणि कर्मचारी यांना धमक्या, शिवीगाळ, आणि अरेरावी होण्याचे प्रकार सुरू होते. काही समाजकंटकांनी “ॲट्रॉसिटी गुन्ह्यात अडकवू,” तसेच “आमच्याकडे मुली आहेत, त्यात तुम्हाला अडकवू,” अशा धमक्या दिल्याच्या तक्रारी होत्या. तसेच, रात्रीच्या वेळी मद्यपींचे हॉस्पिटलमध्ये वावरणे, विनाकारण वॉर्डमध्ये घुसणे, रुग्ण दाखल करण्यावरून स्टाफशी वाद घालणे, हे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची ठोस भूमिका
या परिस्थितीचा ८ मार्च रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट घेऊन आढावा घेतला. रुग्णालयातील असुरक्षिततेबाबत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आणि तातडीने कडक कारवाईचे निर्देश दिले.
“रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल, तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा तातडीने बंदोबस्त व्हायला हवा!” असे ते ठामपणे म्हणाले.
पोलिसांची तत्काळ कारवाई – ६ पोलिसांचे पथक तैनात
आमदार पाटील यांच्या निर्देशानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली. ६ पोलिसांचे विशेष पथक रुग्णालयात सतत गस्त घालणार आहे. तसेच, दिवस-रात्र गस्त घालणाऱ्या पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
“यामुळे रात्री-अपरात्री होणाऱ्या गुंडगिरीला आळा बसेल. जर या समाजकंटकांनी पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली, तर अजिबात न घाबरता मला किंवा पोलिसांना कळवा!” असा स्पष्ट इशारा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.
पोलिसांना दिले स्पष्ट निर्देश – कोणत्याही समाजकंटकाला गय नाही!
पोलिसांनी सामान्य नागरिक, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, कोणतेही गैरवर्तन सहन केले जाणार नाही, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, “यामध्ये कोणतीही कुचराई झाली, तर मी ती कदापि सहन करणार नाही!” असा कडक इशारा देखील त्यांनी दिला.
रुग्णालय कर्मचाऱ्यांना दिलासा, समाजकंटकांना इशारा!
या कारवाईमुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, गुंडगिरी करणाऱ्या समाजकंटकांना चोख धडा शिकवला जाणार, अशी अपेक्षा आहे. जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पुन्हा सक्रिय झाले, तर आणखी कठोर पावले उचलण्यात येतील, असा कडक इशारा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.