मुंबई – धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. “बांधा – वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर पहिल्या टप्प्यात धाराशिव येथे भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. या बरोबरच येरमाळा आणि उमरगा येथील बसस्थानकांचाही विकास केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
विधिमंडळ प्रांगणात धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बसस्थानकांचे गटविभाग आणि निविदा प्रक्रिया
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध जागा भविष्यात “बांधा – वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. या जागांचे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण असे तीन गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील प्रत्येकी एक बसस्थानक निवडून तीन बसस्थानकांचा एक समूह करून त्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बसस्थानकांची निविदा मागवली जाणार असून, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, येरमाळा आणि उमरगा या बसस्थानकांचा समावेश आहे. या बसस्थानकांमध्ये सुसज्ज प्रवासी सुविधा, प्रसाधनगृह, कर्मचारी विश्रांतीगृह, आधुनिक आगार, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, सोलर प्लांट आणि वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील.
जलद अंमलबजावणीची ग्वाही
निविदा प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असून, बसस्थानकांच्या कामालाही त्वरित सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही मंत्री सरनाईक यांनी दिली. धाराशिवसह येरमाळा आणि उमरगा येथील प्रवाशांना या सुविधांचा लवकरच लाभ मिळणार आहे.