धाराशिव – शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे बनावट खत तयार करणाऱ्या ‘तेरणा व्हॅली फर्टिलायझर अँण्ड केमिकल’ या कारखान्यावर जिल्हास्तरीय भरारी पथकाने धाड टाकली. या तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने कंपनीचा खत निर्मिती आणि विक्रीचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर यांना तामलवाडी येथे बनावट खत कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार, कृषी विकास अधिकारी एन. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने या कारखान्याची अचानक तपासणी केली. या कारवाईत प्रविण पाटील, व्ही. एम. भुतेकर, डी. व्ही. मुळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.
तपासणीनंतर पथकाने आपला सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर कृषी आयुक्तालयातील परवाना अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली आणि कंपनीचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृषी विभागाचा विक्रेत्यांना इशारा आणि शेतकऱ्यांना आवाहन
यापुढेही अशा बनावट उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर आणि विक्रेत्यांवर तपासणी सुरूच राहणार असून, दोषी आढळल्यास बियाणे, खते व कीटकनाशके कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
याचबरोबर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे आवाहन केले आहे:
- खते, बियाणे व कीटकनाशके केवळ अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत.
- खरेदी करताना पक्की पावती आणि ई-पॉस मशीनचे बिल घ्यावे.
- खताच्या बॅगवरील किंमत आणि पावतीवरील किंमत जुळते का, हे तपासावे.
- बियाण्यांची पिशवी सीलबंद असल्याची खात्री करून अंतिम मुदत तपासावी.
- खरेदी केलेल्या बियाण्याचे टॅग, पिशवी आणि थोडा नमुना हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावा.