धाराशिव: जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून, कृषी पंप आणि शेती साहित्यावर डल्ला मारणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कळंब, मुरुम, उमरगा आणि धाराशिव शहर परिसरातून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी, केबल आणि स्प्रिंकलर पाईप्स चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. १८) चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मस्सा (खंडेश्वरी) येथून २३ हजारांचा ऐवज लंपास
कळंब तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) शिवारात सुरेश हरीदास फरताडे यांच्या गट नं. ६७८ मधील विहिरीवरून चोरट्यांनी ३ एच.पी.चा पंप, स्टार्टर आणि १०० फूट केबल असा एकूण २२,९७१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ५ ते ६ जानेवारी दरम्यान घडली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कंटेकुरमध्ये शेततळ्यावरील मोटार चोरीला
मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंटेकुर (ता. उमरगा) येथील शरद अशोक भोसले यांनी बटईने केलेल्या शेतातील शेततळ्यावर बसवलेली ५ एच.पी.ची लक्ष्मी कंपनीची मोटार (किंमत १०,००० रुपये) चोरट्यांनी १७ जानेवारीच्या रात्री पळवून नेली.
जकेकुर शिवारात स्प्रिंकलर पाईपची चोरी
उमरगा तालुक्यातील जकेकुर शिवारात भूषण सुधाकर गायकवाड यांच्या शेतातून स्प्रिंकलरचे ५ लोखंडी पाईप (नेजलसह) चोरीला गेले आहेत. १२ ते १३ जानेवारी दरम्यान घडलेल्या या घटनेत सुमारे ७,५०० रुपयांचे नुकसान झाले असून, उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वडगाव शिवारात पानबुडी मोटारवर डल्ला
धाराशिव शहरानजीकच्या सिद्धेश्वर वडगाव येथील विजय महादेव गुरव यांच्या गट नं. ३८६ मधील शेतातून ५ एच.पी.ची रेम्को कंपनीची इलेक्ट्रीक पानबुडी मोटार आणि ६० फूट वायर (किंमत १२,००० रुपये) अज्ञातांनी चोरून नेली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या चारही घटनांमध्ये १८ जानेवारी २०२६ रोजी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.




