धाराशिव: कौडगाव तांडा येथील एमआयडीसी परिसरात काल सायंकाळी एका वादातून एअरगनने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय राजाभाऊ राठोड (वय २३, रा. गोरमळा तांडा) यांचे त्यांचे काका भाऊसाहेब राठोड यांच्याशी भांडण सुरू असताना अजय यांनी त्यांच्या पत्नीला मध्ये बोलू नको म्हणून खांद्यावर हात मारला. चुकून हा हात पारधी समाजातील एका महिलेला लागला. याचा राग मनात धरून किरण श्रीमंत भोसले आणि आदित्य किरण भोसले (दोघेही रा. तांबेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी अजय यांच्या आत्याच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
गावातील लोक आल्याने हे दोघेही मोटरसायकल रोडवर सोडून शेतात पळून जात असताना त्यांनी एअरगन सारख्या बंदुकीतून हल्ला केला. या घटनेची तक्रार अजय राठोड यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी किरण भोसले आणि आदित्य भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.