राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादा – हो हो, तेच आपले अजित पवार! दादांनी बीडचं पालकमंत्रीपद मिळालं आणि काय सांगू, त्यांनी जणू काही ‘पॉवर योगा‘ सुरू केलंय. आधी ते पुण्याच्या मंचावरून चिडचिड करत होते, आता बीडच्या वाळवंटातही घाम गाळायला सुरुवात केलिये. दादा फार्मात आहेत. इतके फार्मात की, आता बीडमधल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ऐवजी थेट “दादा ब्रँड” फार्म मागायला सुरुवात केलीय!
धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद हुकलं आणि दादांना संधी मिळाली. दादा बीडच्या दौऱ्यावर आले आणि मग काय—भाषणात बजेटचा झणझणीत मसाला टाकला.
“मी ७ लाख २० कोटींचं बजेट मांडलंय. एकाने येऊन आकड्यात लिहून दाखवावं!”
हे ऐकल्यावर बीडच्या चहाच्या टपरीवर चर्चा पेटली –
“आपल्या गावातल्या ७ कोटी कुठं? आपल्याला तर ७ रुपये चहा-पावनं जमत नाही!”
दुसरा म्हणाला, “आपण आकड्यांतच कमी पडतो. दादांनी गणित शिकवायला सुरुवात करावी… ‘बजेट क्लासेस बाय दादा!'”
शेतकऱ्यांच्या महिन्याच्या खर्चाबद्दल दादांचं निरीक्षणही थेट हृदयस्पर्शी होतं –
“गरीबांना बजेट कळत नाही, घरचं बजेट सांभाळता येत नाही!”
अहो दादा, घरचं बजेट कळायला हवं असतं, पण तिकडे भाव काय, पाऊस काय, सरकारचं धोरण काय—सगळं ‘नॉन-बजेट’ असतं! तुमचं बजेट म्हणजे ७ लाख २० कोटींचं शाही थाळी आहे, आणि आमचं बजेट म्हणजे “उपासाची प्लेट” – फक्त फक्त भावनेनं भरलेली!
आता बीडमधल्या एका पोराने तर चक्क एक बॅनर लावलं –
“दादा, आकड्यात लिहून दिलंय. पण ते वाचण्यासाठी डोळ्याला चष्मा, पोटाला अन्न, आणि हाताला रोजगार लागतो!”
दादांचा दौरा सुरूच आहे. पुढच्या वेळेस कदाचित ते म्हणतील –
“मी एवढं बजेट मांडलं, पण तुम्ही चार ओळीचं मनोगत का लिहू शकत नाही?”
एक लहान पोरी म्हणाली, “आई, ह्या दादांचं नाव ‘अजित पवार’ की ‘अंकगणित पवार’?”
तर अशा ह्या दादांच्या बीडवारीला आमचा बोरूबहाद्दर यांचं उपवासात्मक वंदन!
आता वाट बघूयात, पुढच्या दौऱ्यात दादा गणिताच्या ट्यूशन क्लासेस सुरू करतात का ते!
- बोरूबहाद्दर