सोलापूर: “मी डेप्युटी सीएम बोलतोय… इतकी डेरिंग आहे तुमची? कारवाई थांबवा!” – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे शब्द सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात वादळाच्या केंद्रस्थानी आहेत. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात कथित बेकायदेशीर मुरुम उत्खननावर कारवाई करणाऱ्या एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला थेट व्हिडिओ कॉलवर खडसावल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली आहे.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
रविवार, ३१ ऑगस्ट रोजी कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होते. हे उत्खनन बेकायदेशीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर करमाळा उपविभागाच्या पोलीस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा व्ही. एस. आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी उत्खननाची रॉयल्टी पावती मागितली, मात्र ती सादर न करता आल्याने त्यांनी कारवाई सुरू केली.
याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष आणि सरपंच बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला. सुरुवातीला आवाजावरून ओळख न पटल्याने डीवायएसपी अंजना यांनी नियमानुसार आपल्या अधिकृत मोबाईलवर फोन करण्यास सांगितले. मात्र, यानंतर थेट व्हिडिओ कॉल आला आणि खुद्द अजित पवार यांनी “माझा चेहरा तरी ओळखाल ना?” असं म्हणत कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
दावे-प्रतिदावे आणि राजकीय घमासान
सरपंच बाबा जगताप यांच्या मते, “हे काम ग्रामपंचायतीचे होते आणि अशा कामांची रॉयल्टी बिलातून वजा होते. आम्हाला चुकीच्या माहितीच्या आधारे लक्ष्य केले गेले.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अजित पवारांची बाजू मांडताना सांगितले की, “शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत कारवाई थांबवावी, एवढेच अजितदादांचे म्हणणे होते. एका डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने उपमुख्यमंत्र्यांना न ओळखणे हे चुकीचे आहे.”
विरोधक आक्रमक:
या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी, “सरकारच गुंडांना अभय देत असेल, तर मंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार?” असा सवाल केला आहे. जनशक्ती शेतकरी संघटनेने तर “अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू,” असा इशारा दिला आहे, तर ‘आप’ने अजित पवार अवैध उत्खननाला पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप केला आहे.
प्रशासकीय मौन आणि कर्तव्यदक्ष अधिकारी
या संपूर्ण गदारोळात, डीवायएसपी अंजना कृष्णा आणि इतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. “चौकशी सुरू आहे,” एवढेच उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे.
केरळच्या अंजना कृष्णा या २०२२-२३ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, करमाळा येथे त्यांची पहिलीच स्वतंत्र नियुक्ती आहे. एका तरुण आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने राजकीय दबावाला न जुमानता घेतलेल्या भूमिकेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे, तर दुसरीकडे राजकीय पदाचा वापर करून प्रशासकीय कामात हस्तक्षेप करण्याच्या या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनोबलावर काय परिणाम होईल, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.