वाशी : भूम तालुक्यातील आंद्रूड येथे आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘राडा होणार, पोरं नाही ऐकणार’ असे प्रक्षोभक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणाऱ्या एका तरुणावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वाशी पोलिसांनी याची स्वतःहून गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आंद्रूड (ता. भूम, जि. धाराशिव) येथे मंगळवारी (ता. ३१ मार्च) गावची यात्रा भरणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने गावातीलच रंजित सतीश लिमकर या तरुणाने रविवारी (ता. २९) दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईलवर एक वादग्रस्त आणि प्रक्षोभक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले.
सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आलेल्या या स्टेटसमध्ये भारतीय दंड विधानातील जुन्या ‘कलम ३०७’ (जीवे मारण्याचा प्रयत्न) चा जाणीवपूर्वक उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नाही तर, ‘मेला तो मारेगा’ आणि ‘राडा होणार, पोरं नाही ऐकणार’ अशी जीवे मारण्याची आणि दंगल घडवण्याची थेट धमकी देणारी वाक्ये त्याने या स्टेटसला ठेवली होती.
यात्रेच्या तोंडावर ठेवण्यात आलेल्या या प्रक्षोभक स्टेटसमुळे आंद्रूड गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी वाशी पोलिसांनी या प्रकाराची तत्परतेने दखल घेतली.
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार मंगेश नामदेव मिसाळ यांनी स्वतः फिर्याद दिली. त्यांनी सोमवारी (ता. ३०) दिलेल्या या प्रथम खबरेवरून वाशी पोलीस ठाण्यात आरोपी रंजित लिमकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९२, ३५१(३), ३५१(४) आणि ३५३(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात्रेच्या काळात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.





