धाराशिव : छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी धाराशिव पोलीस दलाच्या 2024-25 आर्थिक वर्षातील वार्षिक तपासणीचा आढावा घेतला. या तपासणीचा कालावधी 25 मार्च ते 28 मार्च 2025 असा होता. धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये या तपासणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कळंब पोलीस ठाणे व उपविभागीय कार्यालयाला भेट:
दि. 25 मार्च रोजी कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व कळंब पोलीस ठाणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस ठाण्याच्या स्वच्छतेची पाहणी केली. मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा कक्ष, कॅश मोहरर, क्राईम मोहरर यांच्या कामकाजाचे निरीक्षण केले. गुन्हे निर्गती, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, अर्ज निर्गती व गुन्हे प्रतिबंध याबाबतही आढावा घेण्यात आला. कळंब पोलीस ठाणे कॉम्प्युटराईज्ड कामकाजाच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे समाधान मिश्र यांनी व्यक्त केले.
उमरगा पोलीस ठाणे व सौंदर्यीकरण उपक्रम:
दि. 26 मार्च रोजी उमरगा पोलीस ठाणे येथे पोलीस महानिरीक्षकांनी भेट दिली. या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या परिसराची स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि सजावट पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. दगडावर कातळ चित्रे, चाटुवरील पेटींग आणि लाकडी ठोकळ्यांची बैठक व्यवस्था तसेच सेल्फी पॉईंट यामुळे पोलीस ठाण्याचा आकर्षक देखावा निर्माण झाला आहे.
आधुनिक सायबर लॅब आणि ई-मुद्देमाल कक्षाचे उद्घाटन:
धाराशिव जिल्ह्यातील सर्व 18 पोलीस ठाण्यांमध्ये ई-मुद्देमाल कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. आनंदनगर पोलीस ठाण्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-मुद्देमाल कक्षाचे उद्घाटन मा. वीरेंद्र मिश्र यांनी केले. तसेच आधुनिक सायबर लॅबची उभारणी करण्यात आली असून सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे – ऑक्सिजन पार्क आणि वाचनालय:
धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली असून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले. धाराशिव शहर पोलीस ठाण्यास आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक शकील शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सेरेमोनियल परेड आणि पोलीस कवायत:
दि. 28 मार्च रोजी धाराशिव पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सेरेमोनियल परेडचे आयोजन करण्यात आले होते. परेडचे नेतृत्व पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी केले. विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी परेडचे बारकाईने निरीक्षण करून पोलीसांच्या शिस्तबद्धतेबद्दल समाधान व्यक्त केले.
पोलीसांच्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान:
वार्षिक तपासणी दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. धाराशिव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक शकील शेख यांना आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल गौरवण्यात आले. तसेच उमरगा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस निरीक्षक अश्विनी शामराव भोसले, सपोनि श्रीकांत भराटे, जी. पी. पुजरवाड, आर. एस. चाटे, वाहतूक शाखेतील सचिन बेंद्रे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर, स्थागुशा धाराशिव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन विश्वनाथ खटके, अमोल सुभाष मोरे, प्रमुख लिपीक परमेश्वर उत्तरेश्वर आप्पा गंभीरे आणि दहशतवादी विरोधी शाखेचे सपोनि प्रविण सोमवंशी यांनाही गौरवण्यात आले. महिला सुरक्षा विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला पोलीस नाईक प्रज्ञा जाधव, महिला पोलीस हवालदार सीमा बडे, पल्लवी सतीश काटे यांनाही सन्मानित करण्यात आले.
या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.
वार्षिक तपासणी दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, वाहतूक नियंत्रण, दहशतवादी विरोधी पथक तसेच महिला सुरक्षा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरवण्यात आले.