बार्शी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक मैदान यंदा प्रचंड रंगतदार होणार आहे! नेहमीच्या राजा राऊत आणि दिलीप सोपल यांच्या ‘शाश्वत’ लढाईत आता आणखी एक राजा उतरला आहे, आणि त्याचे नाव आहे – राजा माने!
विद्यमान आमदार राजा राऊत, ज्यांनी कधी शिवसेना, कधी अपक्ष, तर आता खांद्यावर भगवा घेऊन महायुतीकडून मैदानात उतरले आहेत. सोबतच, त्यांचे लिंगायत प्रतिद्वंद्वी, दिलीप सोपल, हे यंदा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मानकरी बनून सत्तेचा तख्ता उलथवायला सज्ज आहेत.
आता राऊत – सोपलमध्ये आमने-सामने तुफान लढाई रंगेल, असं वाटत असतानाच, अचानक बार्शीच्या या रिंगणात दुसरा ‘राजा’ उडी मारत आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखलंत – पत्रकार राजा माने! वर्षानुवर्षे राजकीय विश्लेषक म्हणून राजकारणाचा माणिक मोती शोधणाऱ्या माने यांनी आता स्वतःच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लोकमत, लोकपत्र, एकमत , तरुण भारत अशा विविध वृत्तपत्रांत राजकीय वार्तापत्रं लिहून अनेकांच्या डोक्यात प्रकाश टाकला आहे, पण यंदा ते निवडणूक लढवणार, ते पण थेट ‘राजे’ म्हणून!
या गोंधळात अजून एक ट्विस्ट म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी विद्यमान आमदार राजा राऊत यांच्याविरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजा राऊत यांना सत्तेच्या खुर्चीसाठी यंदा सोपलच नव्हे, तर जरांगे यांचा विरोधही तितकाच तीव्र वाटेल!
तर बार्शीच्या जनतेला आता सोपल की दोन राजांपैकी कुणाला निवडायचं हा मोठाच प्रश्न पडला आहे. अखेर कोणता हुकमाचा ‘राजा’ बार्शीच्या राजकीय गादीवर बसेल, हे पाहणं आता मात्र खूपच मनोरंजक ठरणार आहे!