परंडा-बार्शी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी तपासाचा धडाका कायम ठेवत आणखी दोन ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. या नवीन कारवाईमुळे या गंभीर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. अटक करण्यात आलेल्या नवीन आरोपींपैकी एक जण बार्शी तालुक्यातील तर दुसरा परंडा तालुक्यातील रहिवासी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकूण आठ आरोपींपैकी तब्बल पाच जण परंडा शहर आणि तालुक्यातील असल्याने, अमली पदार्थांच्या तस्करीचे परंडा कनेक्शन अधिक गडद झाले आहे. दरम्यान, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.
आतापर्यंतची कारवाई आणि अटक सत्र:
- १७ एप्रिल २०२५: बार्शी पोलिसांनी परंडा रोड परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली होती. यामध्ये असद हसन देहलुज (वय ३७, रा. परांडा), मेहफुज महंमद शेख (वय १९, रा. बावची, ता. परांडा) आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय ३२, रा. बार्शी) यांचा समावेश होता.
- १९ एप्रिल २०२५: तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. यात परंडा येथील वसीम इसाक बेग आणि जावेद नवाबमुद्दीन मुजावर तसेच बार्शी येथील जमीर अन्सार पटेल यांचा समावेश होता.
- नवीन अटक – २५ एप्रिल २०२५ : पोलिसांनी आणखी दोन ड्रग्ज पेडलर्सना अटक केली, यात परंडा येथील दीपक शामराव काळे, आणि खांडवी ( बार्शी ) आयाज मुन्ना शेख यांचा समावेश आहे , यामुळे एकूण आरोपींची संख्या ८ झाली आहे, ज्यापैकी ५ परंडा कनेक्शनचे आहेत.
जप्त मुद्देमाल (१७ एप्रिलच्या कारवाईतील):
पोलिसांनी पहिल्या कारवाईत एकूण १३,०२,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता, ज्यामध्ये:
- १० लाख रुपयांची टोयोटा कोरोला कार (MH 12 HN 7437)
- एकूण २०.०४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज (किंमत अंदाजे १,५०,४०० रु.)
- एक गावठी पिस्तूल (किंमत ६०,००० रु.)
- ३ जिवंत काडतुसे (किंमत ३,००० रु.)
- तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांचा समावेश होता.
कायदेशीर कारवाई आणि तपास:
या सर्व आरोपींविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५३/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८(क), २२(ब), २९, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे.
पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे बार्शी आणि परंडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस येत असून, मुख्य सूत्रधार फरार असला तरी पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.