धाराशिव: बेंबळी (ता. धाराशिव) येथील सरपंच सौ. वंदना नवनाथ कांबळे ( भाजप ) यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अन्वये सरपंच व ग्रामपंचायत सदस्य या पदांसाठी ग्रामपंचायतच्या उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
पंचायत समिती, धाराशिव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. कांबळे यांनी निहित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे निर्वहन नियमानुसार न केल्यामुळे व त्यांनी केलेल्या अपहाराची व्याप्ती व त्यांच्याविरुद्ध दाखल फौजदारी गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी, बेंबळी यांना रिक्त पदाचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अनिनियम-१९५८ मधील कलम ३८ मधील तरतुदीनुसार नियमित कामकाज चालविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेकडून चौकशी अहवाल सादर
धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी मौजे बेंबळी येथील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात १५ वा वित्त आयोग, दलीत वस्ती सुधार योजना आणि विविध विकास योजना अंतर्गत वसूल पात्र रकमेचा तपशील देण्यात आला आहे.
तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत एकूण ४२,३०,८६०/- रुपये वसूल पात्र असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, तालुका तांत्रिक अधिकारी किंवा राज्य गुणवत्ता अधिक्षक यांच्याकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी ७,३०,४३२/- रुपये वसूल करण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील चौकशी अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पं) यांनी यापूर्वी नमूद केलेल्या रकमेत मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांचा खुलासा मागविण्यात येणार आहे. ही माहिती धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.