धाराशिव: शासन नियमांचे पालन न करणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुद्ध असभ्य वर्तन करणे आदी अनियमितता आढळून आल्याने संजयकुमार डव्हळे, उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांना निलंबित करण्यात आले आहे.
यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब दराडे यांनी संताप व्यक्त केला आहे. डव्हळे हे प्रामाणिक अधिकारी असून त्यांना षड्यंत्र करून निलंबित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दराडे यांनी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या निलंबनामागे “सिंदफळ कनेक्शन” असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गैरप्रकार घडल्याची तक्रार श्री. डव्हळे यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी तपासणी सुरू केली होती. हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या विरुद्ध आंदोलन उभे राहिले आणि तडकाफडकी त्यांचे निलंबन झाले.
यामागे मोठे कांड असल्याचा संशय दराडे यांनी व्यक्त केला आहे. श्री. डव्हळे यांच्या निलंबनाने कोणाच्या डोक्यावरची टांगती तलवार बाजूला झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संजयकुमार डव्हळे यांना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आल्याने आपण महसूल मंत्री यांच्यापर्यंत जाणार असल्याचे दराडे यांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय ?
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावातील सर्वे नंबर 176 चा एनए लेआउट धाराशिव तहसीलदारांनी मंजूर केला, तसेच त्याच सर्वे नंबरचा लेआउट तुळजापूर तहसीलदारांनी सुद्धा मंजूर केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या संपूर्ण 73 प्लॉटच्या लेआउटची खरेदी एका व्यक्तीने 9 डिसेंबर रोजी केली होती.
या प्रकरणी अमोल जाधव यांनी 26 डिसेंबर रोजी धाराशिव तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू झाला. तहसील कार्यालयाचे श्री. डव्हळे यांनी तत्काळ चौकशी करताना अनेक गंभीर गैरप्रकार आढळून आणले. त्यांनी या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. यानंतर 27 डिसेंबर रोजी वादग्रस्त दस्त रद्द करण्यात आले.
दरम्यान, धाराशिव तहसील कार्यालयातील अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमुळे भीतीच्या वातावरणात असलेल्या तहसीलदारांनी घोटाळा उघड करणाऱ्या श्री.डव्हळे यांच्याविरोधात विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणामुळे धाराशिव तहसील कार्यालयातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
- सामाजिक कार्यकर्त्यांनी डव्हळे यांच्या निलंबनाला षड्यंत्र म्हटले आहे.
- डव्हळे यांच्या निलंबनामागे “सिंदफळ कनेक्शन” असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
- या प्रकरणाची सत्यता तपासून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Video