धाराशिव – बेंबळी येथील झिंगाडे नर्सिंग होमचे संचालक डॉ. सुधीर झिंगाडे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून एक गंभीर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस तालुका आरोग्य अधिकारी यांनी 16 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या तपासणीअंती देण्यात आली आहे. या तपासणीत झिंगाडे नर्सिंग होममध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नोटीसमध्ये नमूद केलेल्या त्रुटी
वैद्यकीय परवाना नूतनीकरणाचा अभाव – डॉ. झिंगाडे यांनी बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्टच्या नियमानुसार 31 मार्च 2001 पर्यंत आपला वैद्यकीय परवाना नूतनीकरण केलेला नाही, हे तपासणीत उघडकीस आले आहे.
प्रिस्क्रिप्शन पॅडवरील चुकीची माहिती – डॉक्टरांनी आपल्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर शैक्षणिक अर्हतेची चुकीची नोंद केली आहे. त्यांनी DM&S ऐवजी MMBS अशी नोंद केली आहे, जी तथ्यहीन आहे.
अतिरिक्त बेडची व्यवस्था – बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार नर्सिंग होमला केवळ दोन बेडची परवानगी आहे, परंतु प्रत्यक्षात चार बेडची व्यवस्था आढळून आली आहे.
संडास बाथरूमची कमतरता – बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्टच्या नियमांचे उल्लंघन करत नर्सिंग होममध्ये संडास बाथरूमची व्यवस्था उपलब्ध नव्हती.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉ. झिंगाडे यांना वरील सर्व मुद्द्यांवर दोन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. जर समाधानकारक खुलासा न मिळाल्यास, बॉम्बे नर्सिंग रजिस्ट्रेशन अॅक्ट अंतर्गत दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
धाराशिव लाइव्हचा दणका
काझी शहेबाज नसिरोद्दीन ( रा. बेंबळी ) यांनी तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांच्याविरुद्ध 26 जून 2024 रोजी यासंदर्भात तक्रार केली होती. परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यानी आजवर सुधीर झिंगाडे यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. धाराशिव लाइव्हमध्ये याबाबत बातमी प्रकाशित होताच, अखेर आरोग्य विभागाला जाग आली आहे.
आरोग्याशी खेळ? धाराशिव आरोग्य यंत्रणेला आव्हान !