बेंबळी – बेंबळी पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७ मार्च) रात्री धुत्ता पाटी परिसरात कारवाई करून अवैधरीत्या गोवंश कत्तल प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जाकीरखॉ नसिरखॉ पठाण (वय ५२, रा. मोगलपुरा, संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि मालक महंमद रफीक उस्मान कुरेशी (वय ३३, रा. मदीनानगर, संगमनेर) यांनी पशुवैद्यकीय विभागाची पूर्व परवानगी न घेता गोवंशाची कत्तल करून संशयित गोमांस वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानुसार, बेंबळी पोलिसांनी एमएच १७ सी.व्ही. ३५४९ क्रमांकाच्या आयशर टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन टन संशयित गोमांस सापडले. जप्त केलेल्या गोमांसाची अंदाजे किंमत ३,६०,००० रुपये आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियमांतर्गत कलम ५ (क), ९ (अ) तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.