धाराशिव : महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग नागपूर ते गोवा जोडणारा असून, तो धाराशिव जिल्ह्यातूनही जाणार आहे. मात्र, या महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला.
आज (दि. ९) नितळी (ता. धाराशिव) येथे महामार्गाच्या सीमांकनासाठी खासगी कंपनीचे तीन कर्मचारी आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी त्यांना रोखले आणि “आमच्या जमिनी या महामार्गासाठी देणार नाही” अशी ठाम भूमिका घेत त्यांना परत पाठवले. या घटनेमुळे महामार्गाच्या भूसंपादनास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी नामदेव जगताप, लहू जगताप, किसन काकडे, नामदेव रंधले यांसारख्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. सीमांकनाला विरोध करीत त्यांनी महामार्गासाठी भूसंपादन होऊ नये, अशी मागणी केली.
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ आणि गोव्यातील १ जिल्ह्यातून जाणार असून, तो नागपूर आणि गोव्याला जोडणारा सहा-लेन द्रुतगती मार्ग असेल. मात्र, भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे प्रशासनास अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
व्हिडीओ पाहा