छत्रपती संभाजीनगर : स्वतःच्या मुलालाच ग्रामपंचायतीची कामे दिल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी ग्रामपंचायतीच्या सरपंच फातिमा सत्तार शेख यांना सदस्यपदावरून अपात्र ठरविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अपर विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४(१)(ग) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी आकाश जगन्नाथ मुंगळे यांनी याप्रकरणी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. सरपंच फातिमा शेख यांचा मुलगा समद शेख याला ग्रामपंचायतीमार्फत सिमेंट रस्ता व ड्रेनेज लाईन बांधकामाची कामे देण्यात आली होती. या कामापोटी ग्रामपंचायतीकडून २६ ऑगस्ट २०२४ रोजी २ लाख ७६ हजार ५६४ रुपये आणि ३० सप्टेंबर २०२४ रोजी १ लाख ८९ हजार ६१ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली. सरपंच पदाचा दुरुपयोग करून मुलाला कामे दिल्याने यात त्यांचा अप्रत्यक्ष हितसंबंध असल्याचा ठपका तक्रारदाराने ठेवला होता.
यावर फातिमा शेख यांनी अपिलात असा बचाव केला की, सदर कामाचे टेंडर २४ जून २०२४ रोजी मंजूर झाले असून त्यावेळी आपण सरपंच नव्हतो. हे काम तत्कालीन सरपंच नितीन इंगळे यांच्या काळात देण्यात आले होते. तसेच, आपला मुलगा समद हा स्वतंत्र वास्तव्यास असून त्याचे मार्च २०२३ पासून स्वतंत्र रेशनकार्ड आहे, त्यामुळे यात आपला सहभाग नसल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणावर अपर विभागीय आयुक्त क्र. २ खुशालसिंह परदेशी यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीअंती आयुक्तांनी स्पष्ट केले की, केवळ रेशनकार्ड विभक्त असल्यामुळे प्रत्यक्षात कौटुंबिक नाते संपुष्टात आले असे मानणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही. ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामामध्ये एखाद्या सदस्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंध असल्यास तो अपात्र ठरतो. या प्रकरणात स्वतःच्या मुलाला ग्रामपंचायतीचे काम दिल्याने सरपंचांचा त्यात अप्रत्यक्ष हितसंबंध स्पष्टपणे दिसून येतो.
या सर्व बाबी आणि उच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा विचार करत, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेला अपात्रतेचा आदेश कायदेशीर व वैध असल्याचे ठरवत विभागीय आयुक्तांनी ११ मार्च २०२६ रोजी फातिमा शेख यांचे अपील फेटाळून लावले. तक्रारदार आकाश जगन्नाथ मुंगळे यांच्या वतीने ऍड.सुशांत चौधरी यांनी बाजू मांडली .
काय आहे प्रकरण?
-
बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी आकाश जगन्नाथ मुंगळे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
-
फातिमा शेख यांचा मुलगा समद सत्तार शेख याला ग्रामपंचायत बेंबळी मार्फत सिमेंट रस्ता व ड्रेनेज लाईन बांधकामाची कामे देण्यात आली होती.
-
या कामापोटी ग्रामपंचायतीकडून २६ ऑगस्ट २०२४ रोजी रु. २,७६,५६४/- आणि ३० सप्टेंबर २०२४ रोजी रु. १,८९,०६१/- इतकी रक्कम अदा करण्यात आली.
-
सरपंच पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या मुलाला कामे दिल्याचा आणि त्यात अप्रत्यक्ष हितसंबंध असल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
सरपंचांचा युक्तिवाद:
-
यावर फातिमा शेख यांनी असा बचाव केला की, सदर कामाचे टेंडर २४ जून २०२४ रोजी मंजूर झाले असून त्यावेळी त्या सरपंच नव्हत्या.
-
हे काम तत्कालीन सरपंच नितीन इंगळे यांच्या काळात देण्यात आले होते.
-
तसेच, आपला मुलगा समद शेख हा स्वतंत्र वास्तव्यास असून त्याचे मार्च २०२३ पासून स्वतंत्र रेशनकार्ड आहे, त्यामुळे यात आपला सहभाग नसल्याचा दावा त्यांनी केला.
विभागीय आयुक्तांचे निरीक्षण व निर्णय:
-
या प्रकरणावर अपर विभागीय आयुक्त क्र. २, छत्रपती संभाजीनगर श्री. खुशालसिंह परदेशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
-
आयुक्तांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, केवळ रेशनकार्ड विभक्त असल्यामुळे प्रत्यक्षात कौटुंबिक नाते संपुष्टात आले असे मानणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही.
-
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ चे कलम १४(१)(ग) नुसार ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामामध्ये एखाद्या सदस्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंध असल्यास तो अपात्र ठरतो.
-
मुलाला ग्रामपंचायतीचे काम दिल्याने सरपंचांचा त्यात अप्रत्यक्ष हितसंबंध स्पष्टपणे दिसून येतो.
या सर्व बाबींचा आणि उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेला अपात्रतेचा आदेश कायदेशीर व वैध असल्याचे ठरवत विभागीय आयुक्तांनी ११ मार्च २०२६ रोजी फातिमा शेख यांचे अपील फेटाळून लावले.






