तुळजापूर: ज्यांच्या बोटांना फक्त मोबाईलचा कीपॅड माहित आहे आणि ज्यांच्या डोक्यात २४ तास दुसऱ्याच्या प्रगतीचा किडा वळवळतो, त्या तमाम ‘सुशिक्षित बेरोजगार सेने’ला तुळजापूरच्या एका पठ्ठ्याने असा काही ‘रिटर्न फवारा’ दिलाय की विचारता सोय नाही. निमित्त ठरलंय एक नवी कोरी करकरीत फॉर्च्युनर आणि विषय आहे ‘ढवरा मटणा’चा!
आधी कौतुक, मग ट्रोलिंगचा चिकटपणा
झालं असं की, तुळजापूर जवळच्या ‘हॉटेल भाग्यश्री’च्या मालकाने, ज्यांच्या हातच्या ‘ढवरा मटणा’वर खवय्ये जीव ओवाळून टाकतात, त्यांनी लेकीच्या वाढदिवसाला नवी फॉर्च्युनर घेतल्याचा व्हिडिओ टाकला. लोकांनी “बाप असावा तर असा!” म्हणत कौतुकाचा पाऊस पाडला. पण म्हणतात ना, जिथं कौतुक असतं, तिथं काही ‘शंकासुरांचा’ जन्म होतोच.
सोशल मीडियाच्या रिकामटेकड्या न्यायाधीशांनी लगेच आपला ‘कीबोर्डरूपी’ हातोडा उचलला. “च्यायला! तीन महिन्यात फॉर्च्युनर? नक्की मटण विकतोय की अजून काय?”, “आज चतुर्थी व्हॉटेल बंद, उद्या एकादशी व्हॉटेल बंद… मग पैसा येतो कुठून?” अशा कमेंट्सनी मालकाला दिवसा-रात्री ‘घोडे’ लावले. जणू काय ह्यांच्याच पगारातून गाडीचा हप्ता जाणार होता!
मालकाचा ‘नो टेन्शन’ फंडा आणि ट्रोलर्सची ‘वाट लागली’
पण आपला हा ‘मटणसम्राट’ पण निब्बर छातीचा निघाला. ज्यांनी ज्यांनी ‘व्हॉटेल बंद’ म्हणून ट्रोल केलं, त्यांना पठ्ठ्याने हसून उत्तर दिलं, “व्हॉटेल बंद म्हणजे धंदा बंद नाही भाऊ, माल आणायला जावं लागतंय, आज दहा कापले, उद्या बारा कापणार!” महिन्याच्या तीस दिवसांपैकी किती दिवस हॉटेल उघडं होतं, याचं गणित लावता लावता ट्रोलर्सच्या डोक्याचा पार भुगा झाला.
गाडी बायकोसाठी, सणसणीत उत्तर ट्रोलर्ससाठी!
आणि मग आला तो दिवस… ज्या दिवशी ट्रोलर्सच्या तोंडाचा पूर्णपणे ‘पचका’ झाला. ज्या गाडीवरून एवढा गदारोळ झाला, ती गाडी पठ्ठ्याने लेकीसाठी नाही, तर थेट बायकोच्या वाढदिवसाला गिफ्ट केल्याचं समोर आलं. “नाद करती काय!” म्हणत, ज्यांनी ज्यांनी लायकी काढली, त्यांच्या थेट तोंडावर ‘कष्टाच्या उत्तराचा’ सणसणीत फवारा मारला गेला.
शेवटी काय, तर दुसऱ्याच्या ताटात डोकावणाऱ्यांनो, जरा स्वतःच्या ताटात पण बघा. ज्यांनी आयुष्यात बायकोला वाढदिवसाला साधी ‘डेअरी मिल्क’ दिली नाही, ते दुसऱ्याच्या फॉर्च्युनरवर जळत बसलेत.
तात्पर्य: भावड्यांनो, बोकूड कापणारा रात्रीतून फॉर्च्युनर घेऊ शकतो, कारण त्याच्याकडे जिगर आणि कष्ट दोन्ही आहे. तुमच्याकडे तर लई ‘गिन्यान’ हाय… ते जरा स्वतःसाठी वापरा आणि निदान एक भेळेचं तरी पॅकेट घेऊन दाखवा!
व्हिडीओ बघा..