तुळजापूर – सत्तेच्या रणधुमाळीत कोण मंत्री होणार, कोण पालकमंत्री होणार, हे काही सांगता येत नाही. पण, भरतशेठ गोगावले यांनी आता हा विषय थेट तुळजाभवानीच्या दरबारात नेला आहे! “आई जगदंबे, मला रायगडचा पालकमंत्री कर!” असं साकडं घालत त्यांनी राजकीय इच्छेला थेट आध्यात्मिक टच दिला आहे.
भरतशेठांचा प्रवास खरोखरच ‘धक्कादायक’ आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड करून ते थेट एकनाथ शिंदेंच्या गोटात सामील झाले. “मंत्रिपद पक्कं!” असा विश्वास असल्याने कोटशिवाय गणवेष पूर्ण नसतो, या विचाराने त्यांनी काही कोटही शिवून घेतले. पण तेव्हा फक्त ‘कोट’ मिळाले, ‘खुर्ची’ नाही!
मात्र, सत्तापालट झाला आणि अखेर भरतशेठांच्या पदरी मंत्रीपद पडलं. रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचा भार घेताना त्यांनी आता आणखी एक महत्वाकांक्षा उचलून धरली – रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची!
पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा केली, पण लगेच गोंधळ माजला. “हे अपात्र निर्णय रद्द करायचे असतात,” असा काहीसा संकेत मिळाल्यानंतर ते नाव मागे घेतलं गेलं. पण रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरूच आहे.
राजकारणात लॉबिंग, ताकद आणि नशीब लागतं, हे ठाऊक असल्याने भरतशेठांनी आता थेट तुळजाभवानीच्या दरबारात हजेरी लावली. “आई जगदंबा, रायगड माझ्या हवाली कर!” अशी आर्जवं त्यांनी केली. आता प्रश्न असा आहे की, देवीने याआधी अनेकांची कामं केली, पण ‘पालकमंत्री’ करण्याचं काही प्रकरण याआधी आलंय का?
आता हे पाहायचं की, देवी भवानी भरतशेठांचं साकडं ऐकणार का, की त्यांच्या नव्या कोटांप्रमाणेच अजूनही थांबायला सांगणार? रायगडच्या गडावर शेवटी कोण चढणार, याची वाट सगळेच बघतायत!
Video