वाशी – भूम तालुक्यातील घाटनांदुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा तपासणी अधिकारी बनून फसवणूक करणारा एक आरोपी अटक करण्यात आला आहे.आरोपीचे नाव बालाजी गौतम कोळी असून तो देवगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता आणि 18 जुलै 2024 रोजी सकाळी 11:45 वाजता जि.प.प्रा. शाळा घाटनांदुर ता. भूम शाळेत जाऊन स्वतःला शाळा तपासणी अधिकारी असल्याचे भासवून शाळेची तपासणी केली.
शाळेतील शिक्षक संजय श्रीरंग वरळे यांना आरोपीच्या वर्तणुकीवर संशय आला आणि त्यांनी त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने खोटे बोलून फसवणूक केल्याचे उघड झाले. नंतर, वरळे यांनी 18 जुलै रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली.आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 204 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.