भूम – धाराशिव जिल्ह्यातील भुम परिसरात जनावरांची क्रूर वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामराजे महादेव शिंदे (वय ३५, रा. बावी, ता. वाशी, जि. धाराशिव) आणि विशाल अंकुश चौधरी (वय २१, रा. गोजवाडा, ता. वाशी, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
या दोघांनी १ मार्च २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान एमएच २५ एजे ३८८७ आणि एमएच १३ सीयु ०५२४ या दोन वाहनांमधून ९ जर्सी गायी आणि ८ खोंड यांची वाहतूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जनावरांना आखूड दोरीने बांधण्यात आले होते, त्यामुळे त्यांना पुरेशी हालचाल करता येत नव्हती. तसेच, त्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती.
पोलिसांना हे वाहन हिवरा येथे आढळून आले. जनावरांची एकूण किंमत १० लाख ९० हजार रुपये आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागण्यास प्रतिबंधक अधिनियम कलम ११ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनावरांची क्रूर वाहतूक: चौघांवर गुन्हा दाखल
नळदुर्ग: सोलापूर आणि हैदराबाद येथून जनावरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या चौघांवर नळदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाजीअली रमजान नदाफ (वय २९, रा. किसान नगर, अक्कलकोट, जि. सोलापूर), बिराप्पा पिरप्पा ख्याडे (वय ४१, रा. भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर), अहमद अमीर मोहम्मद शरीफ (वय २८, रा. राजेंद्र नगर, हैदराबाद) आणि सय्यद उबेद फकरुद्दीन (वय ३६, रा. नरसिंग राजेंद्र नगर, हैदराबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२५ रोजी हे चौघे जण एमएच १३ सीयू ८८९९ या वाहनातून ९ जर्सी गायी आणि ३ वासरे यांची वाहतूक करत होते. ही वाहतूक राष्ट्रीय महामार्ग ६५ वर अणदूर येथील पुलाखाली होत असताना पोलिसांना आढळून आली. जनावरांची एकूण किंमत ५ लाख ९६ हजार रुपये आहे.
जनावरांना आखूड दोरीने बांधल्यामुळे त्यांना हालचाल करणे शक्य नव्हते. तसेच, त्यांच्या अन्न-पाण्याची योग्य व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी या चौघांविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
जनावराला मारहाण करून जीवे मारल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
उमरगा: ज्वारीच्या शेतात घुसलेल्या जनावराला मारहाण करून ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. देवा शंकर बिराजदार (रा. एकोंडी, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक काशिनाथ बनसोडे (वय ३८, रा. कुंभारपट्टी, उमरगा) यांची खिल्लारी जातीची गाय २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता ज्वारीच्या शेतात घुसली. आरोपी देवा बिराजदार यांनी गायीला मारहाण करून अशोक बनसोडे यांच्या घरी आणून सोडले. तसेच, ‘तुझी गाय संध्याकाळपर्यंत जिवंत राहते का बघ’ असे म्हणून निघून गेले. त्यानंतर, अशोक बनसोडे यांची गाय मरण पावली. या घटनेत त्यांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
अशोक बनसोडे यांनी २ मार्च २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देवा बिराजदार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२५ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.