भूम – तालुक्यातील वालवड शिवारात शेतकऱ्याच्या तुरीच्या ढिगाऱ्याला पेटवून देत सुमारे 25 क्विंटल तुरीची हानी केल्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय, शेतात असलेल्या राखणदाराला मारहाण करत त्याच्या वाहनाची तोडफोड केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी 10 जणांविरोधात भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शैलेंद्र प्रताप भाटी (वय 50, रा. वालवड, ता. भुम, जि. धाराशिव, ह.मु. सर्वे नं. 62, हडपसर रेल्वे स्टेशनजवळ, मुंढवा, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अरविंद भगतसिंग साळुंके, सचिन भगतसिंग साळुंके, सुरेन करणसिंग गौड, रेखा जगदीश साळुंके, दमयंती भगतसिंग साळुंके (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात), कैलास सुरचंद साळुंके (रा. ठाणे वेस्ट), अशोक किसन साळुंके (रा. नागपूर), सरोज प्रदीप पवार, बेबी चव्हाण (रा. मुंबई) यांनी 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता वालवड शिवारातील गट क्रमांक 36 मधील तुरीच्या ढिगाऱ्याला आग लावली.
या आगीत सुमारे 20 ते 25 क्विंटल तुरी जळून खाक झाली. तसेच, आरोपींनी शेत राखणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण केली आणि ओमनी गाडीची काच फोडून नुकसान केले.
या तक्रारीवरून भुम पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 326(एफ), 324(4), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भुम पोलीस करत आहेत.
भांडणाच्या कारणावरून कडब्याच्या गंजीला आग; 4 लाखांचे नुकसान
तामलवाडी – भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी गोडाऊनला आग लावून कडब्याच्या गंजी जाळल्याचा प्रकार तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे घडला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निलेश नागनाथ तानवडे (वय 21, रा. सावरगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सोनू बालाजी घोडके आणि गौरी हनमंत बटाणे (दोघे रा. सावरगाव) यांनी दिनांक 10 मार्च 2025 रोजी रात्री 8.45 वाजता इंदिरानगर झोपडपट्टी येथे असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये भांडणाच्या कारणावरून आग लावली. या आगीत फिर्यादीच्या कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या आणि त्यांचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणी निलेश तानवडे यांच्या तक्रारीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 326(एफ), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.