भूम – मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या क्षुल्लक कारणावरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉड, सळई, काठी आणि पट्ट्याने अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील सुकटा गावाजवळ घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या भावाला आणि मित्रालाही या टोळक्याने मारहाण केली. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग अण्णा गोयकर (वय ३७, रा. घाटनांदुर, ता. भूम) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुकटा गावाजवळ दादा गलांडे यांच्या शेताजवळ घडली. फिर्यादी बजरंग गोयकर हे तिथे असताना आरोपींनी “तू आमच्या मोबाईलमध्ये फोटो का काढले?” असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपी पांडुरंग पांढरे, संकेत साळवे (दोघे रा. सुकटा), संदीप सरवदे (रा. भूम), भरत कांबळे (रा. भवानवाडी), पवनचक्कीचे जाधव, सचिन जानकर आणि प्रदीप पिसे यांनी गैरकायदेशीररित्या जमाव जमवून बजरंग गोयकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या टोळक्याने त्यांना लाथाबुक्क्या, काठी, लोखंडी सळई, पट्टा आणि लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, हा प्रकार पाहून बजरंग यांचा चुलत भाऊ स्वप्नील गोयकर आणि मित्र ज्ञानेश्वर करगळ हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी बजरंग गोयकर यांचा मोबाईल फोन फोडून त्यांचे नुकसान केले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर बजरंग गोयकर यांनी सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार दंगल घडवणे, जीवघेणा हल्ला करणे, मारहाण करणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी भूम पोलीस अधिक तपास करत आहेत.