आंबी (ता. भूम) : आंतरवली शिवारातील एका शेतातील घरात अज्ञात चार दरोडेखोरांनी घुसून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून त्यांच्याकडील दागिने, मोबाईल आणि रोकड असा एकूण 30,500 रुपये किमतीचा ऐवज लुटला. ही घटना 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 11.30 ते 12.00 च्या सुमारास घडली.
याबाबत बिभीषण भिमराव जाधव (वय 75, रा. आंतरवली, ता. भूम) यांनी आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जाधव आणि त्यांची पत्नी झोपण्यासाठी शेतातील घरात गेले असता, चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी कोयता व काठीने मारहाण करत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे 6 ग्रॅम वजनाचे दागिने, मोबाईल फोन आणि 1,500 रुपये रोख जबरीने लुटून आरोपी पसार झाले.
या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 309(6), 351(2), 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
तुळजापूरमध्ये प्लॉटवरील बांधकाम साहित्य चोरी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर : शहरातील हाडको परिसरातील एका प्लॉटवर ठेवलेले सिमेंटच्या 50 विटा आणि लोखंडी भंगार साहित्य असा एकूण 6,400 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 15 डिसेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यान घडली असल्याची तक्रार फिर्यादी जयश्री सतीश सरडे (वय 40, रा. हाडको, तुळजापूर) यांनी पोलिसांत दिली आहे.
या चोरीप्रकरणी अभिषेक राजेंद्र माने, अभिजीत राजेंद्र माने आणि उमा राजेंद्र माने (सर्व रा. हाडको, तुळजापूर) यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुळजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
पेठसांगवीतील दोन शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे चोरी; गुन्हा दाखल
लोहारा : पेठसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि यशवंतनगर चव्हाण विद्यालय या दोन शाळांमधून अज्ञात चोरट्यांनी 12,000 रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले. ही घटना 22 फेब्रुवारी संध्याकाळी 6.00 ते 23 फेब्रुवारी सकाळी 10.30 या दरम्यान घडली.
या प्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना अशोक गुंजोटे (वय 38, रा. महालिंगरायवाडी, ह.मु. लातूर) यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात चोरट्यांनी टीन्डी कंपनीचे बुलेट कॅमरे आणि हाईकव्हीजन कंपनीचे चार सीसीटीव्ही कॅमेरे लंपास केले.
या घटनेवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, लोहारा पोलीस पुढील तपास करत आहेत.
दहिफळ येथे पोकलेन मशीनमधून डिझेल चोरी; गुन्हा दाखल
येरमाळा : दहिफळ येथे एका शेतात लावलेल्या पोकलेन मशीनमधून 210 लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरीस गेलेल्या डिझेलची किंमत सुमारे 19,320 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
ही घटना 23 फेब्रुवारीच्या रात्री 3.00 ते 4.00 या वेळेत घडली. या प्रकरणी सुहास केशवराव पाटील (वय 58, रा. तांबरी विभाग, धाराशिव) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.