भूम : तालुक्यातील रामेश्वर शिवारात शेतीच्या रस्त्याच्या किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध भुम पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १५ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना ३० जून २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबतची पहिली फिर्याद सुरज परमेश्वर वनवे (वय ३०, रा. रामेश्वर) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रामेश्वर शिवारातील गट नं. १६५ मध्ये शेत रस्त्याच्या कारणावरून बप्पा शंभू वनवे, भगवान भास्कर वनवे, शिरीष बप्पा वनवे, स्वाती शिरीष वनवे, ज्योती दिपक वनवे, पृथ्वीराज भगवान वनवे आणि ओम दिपक वनवे यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सुरज, त्यांचे वडील परमेश्वर वनवे आणि चुलत भाऊ सागर वनवे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्या, काठी व दगडाने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आई मंगल वनवे यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर, दुसऱ्या गटाचे बप्पा शंभू वनवे (वय ६७, रा. रामेश्वर) यांनी देखील परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गट नं. १६३ मध्ये शेत रस्ता बनवण्याच्या कारणावरून सुरज परमेश्वर वनवे, सागर दत्ता वनवे, परमेश्वर भुजंग वनवे, दत्ता भुजंग वनवे, मंगल भुजंग वनवे आणि बाळुबाई दत्ता वनवे यांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेला मुलगा शिरीष आणि सून स्वाती यांनाही मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या दोन्ही तक्रारींवरून भुम पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९० सह विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत. एकाच कुटुंबातील किरकोळ वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गटांतील सदस्यांवर गुन्हे दाखल झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.