भुम: तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भुम पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एप्रिल २०२५ ते १० जून २०२५ या कालावधीत घडली. गावातीलच एका तरुणाने पीडित मुलीला आपल्या घरी बोलावून घेतले. तिथे त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
घडलेल्या प्रकारानंतर पीडितेच्या आईने २६ ऑगस्ट २०२५ रोजी भुम पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६४, ६४(२)(एम) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८, आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, भुम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.