भूम: कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक केल्या जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची भूम पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १४ सप्टेंबर २०२५) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हाडोंग्री पाटीजवळील पार्डी रोडवर करण्यात आली. पोलिसांनी जर्सी गायी आणि ट्रक असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम शहरातील पार्डी रोडवर एका ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडोंग्री पाटीजवळ सापळा रचून टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ४७ बीएल १०३३) थांबवला.
ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये जर्सी जातीच्या गायींना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे कोंबून भरल्याचे आढळून आले. ही वाहतूक कत्तलीसाठी केली जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ ट्रकचालक अन्सार रसुल कुरेशी (वय २८) याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी गोवंशीय जनावरे आणि ट्रक असा एकूण ८,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी, सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून, आरोपी अन्सार कुरेशी याच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भूम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.