भूम – शहरातील एका वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी करून, ती न दिल्यास दुकान फोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विनोद गायकवाड (रा. कुसुमनगर, भूम) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी वाईन शॉपचे व्यवस्थापक संदीप केशव कान्होरे (वय ५८, रा. सोलापूर, ह.मु. भूम) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास आरोपी अक्षय गायकवाड हा शहरातील इंदीरा सन्स वाईन मर्चंट या दुकानात आला. त्याने फिर्यादी कान्होरे यांच्याकडे एक हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
“खंडणी दिली नाही, तर वाईन शॉप चालू देणार नाही, दुकान फोडून टाकेन,” अशी धमकी देत आरोपीने दुकानातून तीन बिअरच्या बाटल्या पैसे न देता जबरदस्तीने नेल्या. फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, यापूर्वीही आरोपीने दोन हजार रुपयांची खंडणी मागितली होती आणि पैसे न दिल्याने तो दुकानातून ११ बिअरच्या बाटल्या घेऊन गेला होता.
या सततच्या त्रासाला कंटाळून संदीप कान्होरे यांनी अखेर १४ ऑगस्ट रोजी भूम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अक्षय गायकवाड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) आणि ३५१(२) अन्वये खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.