जळकोट – बायोडिझेल वितरणाची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ३२ लाख २२ हजार ५९३ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रफुल काशिनाथ कारले (वय ३८, रा. जळकोट) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रतन जांगीड (हिंदुस्थान बायोडिजेल इंडस्ट्रिज प्रा. लि. चे संचालक), नारायण जांगीड, अजय तनवर (तिघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), नितीन सुखदेव आराख, अजय खरात, अंजली आंबेकर, प्रथमेश देशमुख, रोहीत सिंग (सर्व रा. स्कायमॅक्स, दत्त मंदीर चौक, विमान नगर, पुणे) यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ ऑक्टोबर २०२४ रोजी जळकोट येथे आरोपींनी कारले यांना बायोडिझेल वितरणाची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ३२ लाख २२ हजार ५९३ रुपये घेतले. मात्र, त्यानंतर एजन्सी न देता आरोपींनी कारले यांच्याशी फसवणूक केली. याशिवाय, त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली.
कारले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि.सं. कलम 406, 409, 417, 420,465,467, 468, 471, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.