धाराशिव: शहरातील डीपी रस्त्यांच्या कामांबाबत नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशाचे श्रेय शिवसेना (उबाठा गट) खोटेपणाने घेत असून, हा केवळ आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार आहे, असा घणाघाती हल्ला भाजप नेत्यांनी केला आहे. वास्तविक हा आदेश उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यासाठी दिला असून, कामांना उशीर होण्यास आणि टक्केवारीसाठी खोडा घालण्यास उबाठा गटच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, शहराध्यक्ष अभय इंगळे आणि माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या भाजप नेत्यांनी म्हटले आहे की, उबाठा गट त्यांच्या आंदोलनामुळेच शासनाने अंदाजपत्रकीय दराने निविदा मंजूर करण्याचा किंवा फेरनिविदा काढण्याचा आदेश दिला असल्याचा खोटा दावा करत आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाची सर्व कामे राज्यात अंदाजपत्रकीय दरानेच व्हावीत, असा स्पष्ट आदेश काढला आहे. हा आदेश केवळ धाराशिवपुरता मर्यादित नाही. उबाठा गटाचा दावा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असे भाजपने म्हटले आहे.
“नगरोत्थान योजनेतील ही कामे राज्यातील इतर शहरांमध्ये जवळपास पूर्ण झाली आहेत, पण धाराशिवमध्ये उशीर झाला. आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात धाराशिव नसतानाही जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. मात्र, उबाठा गटाने काहीही न करता टक्केवारीसाठी कामात अडथळे आणले,” असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. कामांना उशीर का झाला, टक्केवारीसाठी कोणी खोडा घातला आणि जिल्ह्यातील ‘टक्केवारी वसुली विद्यापीठाचे कुलगुरू व सहकुलगुरू’ कोण आहेत, हे लवकरच पुराव्यानिशी उघड करणार असल्याचा इशाराही भाजपने दिला आहे.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला उबाठा गटाने लादलेली भुयारी गटार योजना जबाबदार असल्याचा ठपकाही भाजपने ठेवला आहे. “नैसर्गिक उतारा असलेल्या आणि पाच मिनिटांत पाण्याचा निचरा होणाऱ्या धाराशिव शहरात भुयारी गटार योजनेची गरज नसताना ती का आणली? यातून कोट्यवधींचा मलिदा कोणी हडप केला? कोणत्या तिघांनी स्वतःचे उखळ पांढरे केले आणि कोणी हात धुवून घेतले, हे सर्व पुराव्यासह जनतेसमोर मांडणार,” असे आव्हान भाजपने दिले आहे.
उबाठा गटाचे आंदोलन हे केवळ स्टंट असून, गेल्या पाच वर्षांतील भ्रष्ट कारभार आणि पापांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. मात्र, आम्ही हा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा पुराव्यानिशी जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे सुनील काकडे, अभय इंगळे आणि अमित शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.