संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची चर्चा थंडावते न थंडावते, तोच भारतीय जनता पक्षाने एक असा ‘न भूतो न भविष्यति’ निर्णय घेतला आहे, ज्याने तुळजापूरच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विवेकावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ज्या प्रकरणाने जिल्ह्याची मान शरमेने खाली घातली, त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी पिटू उर्फ विनोद गंगणे याला भाजपने थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करणे, हा निव्वळ राजकीय निर्णय नसून, ही एकप्रकारे तुळजापूरच्या जनतेची घोर फसवणूक आणि नैतिक दिवाळखोरी आहे.
विनोद गंगणे याची ओळख काय? तर आमदार राणा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता. त्याची ‘कर्तृत्वाची’ ओळख काय? तर ड्रग्ज प्रकरणात अटक, एक महिन्याचा तुरुंगवास आणि सध्या जामिनावर सुटका. जो आरोपी कालपर्यंत तुरुंगाच्या गजाआड होता, ज्याच्यावर तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या ‘ड्रग्ज’च्या रॅकेटमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप आहे, तोच इसम आज शहराचा ‘प्रथम नागरिक’ होण्याच्या शर्यतीत उतरवला जातो. यापेक्षा मोठा विनोद, यापेक्षा मोठी शोकांतिका आणि यापेक्षा मोठा निर्लज्जपणा दुसरा असूच शकत नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा काही भाजपचा पहिलाच ‘पवित्र’ निर्णय नाही. याच आमदार राणा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी याच ड्रग्ज प्रकरणातील अन्य दोन आरोपींना, माजी नगराध्यक्ष बापू कणे आणि संतोष परमेश्वर कदम यांना, मोठ्या थाटामाटात पक्षात प्रवेश दिला होता. जणू काही त्यांनी मोठा पराक्रम गाजवून आणला होता. तेव्हाच जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आता गंगणे याला थेट उमेदवारी देऊन, भाजपने हे सिद्ध केले आहे की, त्यांच्यासाठी ‘सत्तेपुढील शहाणपण’ नव्हे, तर ‘सत्तेपुढील नैतिकता’ शून्य झाली आहे.
प्रश्न असा पडतो की, ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपला उमेदवारीसाठी इतके ‘रत्न’पारखी व्हावे लागले का? की आमदार राणा पाटील यांच्या राजकीय हट्टापायी आणि कार्यकर्त्यांच्या ‘पुनर्वसना’च्या अट्टहासामुळे पक्षाची संपूर्ण विचारधाराच गहाण ठेवली गेली आहे?
नगराध्यक्ष हे पद शहराच्या अस्मितेचे प्रतीक असते. ते पद जबाबदारीचे, विश्वासाचे आणि सन्मानाचे असते. त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीकडून स्वच्छ चारित्र्याची, नैतिकतेची आणि समाजहिताची अपेक्षा असते. मात्र, येथे तर ज्याच्यावर समाज पोखरून काढल्याचा आरोप आहे, त्यालाच ‘समाजसेवक’ म्हणून प्रस्थापित करण्याचा हा केविलवाणा आणि संतापजनक प्रयत्न आहे. हा तुळजापूरच्या मतदारांचा, आई तुळजाभवानीच्या भक्तांचा आणि कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाचा घोर अपमान आहे.
आधी ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पक्षात घेऊन ‘शुद्ध’ करणे आणि आता त्यातीलच एकाला थेट ‘लोकप्रतिनिधी’ बनवण्याचा हा खटाटोप, हे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे नाही, तर ‘गुन्हेगारांचे राजकीय उदात्तीकरण’ करण्याचे एक भयाण पर्व आहे. हा निर्णय म्हणजे, ‘आम्ही कोणालाही पावन करून घेऊ शकतो आणि सत्तेच्या जोरावर काहीही करू शकतो,’ असा उघड-उघड संदेश देण्याचा प्रकार आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे तुळजापूरच्या राजकीय वर्तुळात जी खळबळ उडाली आहे, त्यापेक्षा जास्त संताप सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. सत्तेची नशा ही ड्रग्जच्या नशेपेक्षाही किती घातक असू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता तुळजापूरच्या सुज्ञ जनतेनेच ठरवायचे आहे की, त्यांना पवित्र तीर्थक्षेत्राची ओळख जपायची आहे, की राजकारण्यांच्या या ‘गलिच्छ’ राजकारणाला बळी पडून शहराच्या प्रतिमेला काळा डाग लावून घ्यायचा आहे.
– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह







