भूम : भूम तालुक्यातील आरसोली शिवारात प्रशासनाची परवानगी न घेता आणि पोलिसांची नोटीस झुगारून रेड्यांच्या टकरी (झुंजी) आयोजित केल्याप्रकरणी भूम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पैजेसाठी आणि मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या टकरींत प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी आणि लोकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी आयोजकांसह एकूण १३ जणांवर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास मौजे आरसोली (ता. भूम) येथील शेत शिवारात, खडी क्रेशर मशीनच्या बाजूला असलेल्या पटांगणात हा प्रकार घडला. आरोपी विजयसिंह थोरात यांना रेड्यांच्या टकरी न घेण्याबाबत पोलिसांनी कलम १६८ बी.एन.एस.एस. अन्वये आगाऊ नोटीस दिली होती. मात्र, त्यांनी ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आणि आपले पुतणे यशवंत थोरात यांच्या मदतीने टकरींचे आयोजन केले.
या स्पर्धेत रेड्यांना एकमेकांशी झुंजवून जखमी करण्यात आले. तसेच, झुंजीत उधळलेले रेडे तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या दिशेने पळाल्याने बघ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलीस नाईक संदेश पंडित क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
पोलिसांनी खालील १३ जणांवर गुन्हा क्रमांक ३८१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५, २९१ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (a), (m), (n) नुसार गुन्हा दाखल केला आहे:
-
आयोजक: १) विजयसिंह थोरात, २) यशवंत धनाजी थोरात (दोघे रा. भूम).
-
रेडा मालक: ३) बालाजी लाला काळे (रा. हिवरा), ४) निलेश गुळमे (रा. भूम), ५) रावजी उर्फ पल्या काळे (रा. कल्याणनगर, भूम), ६) शंकर राजु काळे (रा. ढोकी), ७) विलास भारती, ८) विलास लोंढे, ९) ओंकार होळकर, १०) गुड्डु गाडे (सर्व रा. भूम).
-
पंच: ११) सुनिल माळी, १२) जावेद शेख, १३) स्वप्निल उर्फ पिट्या हावळे (सर्व रा. भूम).
सदर कारवाई पोलीस निरीक्षक कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करत आहेत.






