परंडा : परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालून नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आचारसंहितेचा भंग करणे, शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर ईस्माईल सौदागर यांच्यासह २५ हून अधिक जणांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास घडली. परंडा नगर परिषद कार्यालयातील सभागृहात निवडणूक प्रक्रियेनुसार नामनिर्देशन अर्जांची छाननी सुरू होती. यावेळी आरोपींनी नगर परिषद कार्यालय आणि मुख्य गेटवर गर्दी करून निवडणूक कामात व्यत्यय आणला.आरोपींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत गोंधळ घातला. परिस्थिती चिघळल्याने आरोपींनी नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक केली. या कृत्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले असून, स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी परंडा नगर परिषदेचे नगर अभियंता राहुल बंडू रणदिवे (रा. बावची रोड, परंडा) यांनी १९ नोव्हेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम २२३, २२१, १८९(२), १९१(२), १९०, १२५, १९४(२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:
जाकीर ईस्माईल सौदागर, कैफ आब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील ईस्माईल सौदागर, गबु ईस्माईल सौदागर, वाहेद ईस्माईल सौदागर, सोनु आत्तार, रहिमान सौदागर, शर्फराज महंमद शरिफ कुरेशी, शेरु ईस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफु निसार सौदागर, नुतलिब आब्दुल सत्तार कुरेशी, ईस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी (सर्व रा. परंडा).
पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.






