तुळजापूर पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देऊन वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवराज रेवणसिध्द लोकरे आणि तुळशीराम बापुराव लोकरे अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ५ वाजता तुळजापूर ते लातुर रोडवर काक्रंबा शिवारात भारत पेट्रोल पंपा समोर, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील दोन बोलेरो पिकअपमध्ये (क्रमांक एमएच १३ सीयु ०३८६ आणि एमएच १३ ए.एक्स ७०४८) २ जर्सी गायी, २ बैल, २ हालगट, ३ कालवड असे एकूण ८५,००० रुपये किमतीचे जनावरे भरले होते.
पिकअपमध्ये जनावरे दाटीवाटीने बांधलेली होती आणि त्यांना निर्दयतेने वागवले जात होते. त्यांच्यासाठी चारापाण्याची व्यवस्थाही नव्हती. हे जनावरे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.
तुळजापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(अ), ११(१)(बी), ११(१) (एच) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.