तामलवाडी – तुळजापूर तालुक्यातील काटी येथील एका शेतात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांची चामडी बाळगल्याचा प्रकार तामलवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ लाख ९४ हजार ६०० रुपये किमतीची २५ जनावरांची चामडी आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वजीर अंबीर कुरेशी (वय ४०, रा. काटी, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून २०२५ रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास काटी येथील गट क्रमांक ११३३ मधील आरोपी वजीर कुरेशी याच्या शेतात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
यावेळी पोलिसांना घटनास्थळी गायी आणि वासरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून २५ जनावरांची चामडी आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २,९४,६०० रुपये आहे.
याप्रकरणी पोलीस स्वतः सरकारतर्फे फिर्यादी झाले असून, आरोपी वजीर कुरेशी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(बी), ५(क)(१), ९(अ) आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(के) अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.