धाराशिव – आज सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा असून संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी १ लाख कोटी व भांडवली गुंतवणुकीसाठी ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्याचे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.यामुळे देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीसोबत तरुणांसाठी असंख्य नवीन रोजगार संधी तयार होणार आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
रुफटॉप सोलर योजनेतून देखील स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात वर्षातील ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो त्यामुळे धाराशिव शहरात रूफ टॉप सोलर योजना राबविण्यासाठी आपण १३ वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता मात्र तत्कालीन सरकारने याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता आता मात्र मोदींजींच्या नेतृत्वाखाली सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने धाराशिवच्या नागरिकांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे.नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक असणारा हा अंतरिम अर्थसंकल्प युवा, गरीब, महिला आणि शेतकरी या ४ स्तंभांना सक्षम करून २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देणारा आहे, असेही आ.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले .
मागच्या घोषणाचा विसर अन् नव्या योजनांचा पाऊस – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
अर्थसंकल्पात वाढलेल्या महागाईबाबत ब्र शब्द काढलेला नाही. शेतीसंदर्भात दरवर्षी किमान आकडेवारी देऊन धुळफेक केली जात होती यंदातर तेही केल्याच दिसत नाही. सरकारच धोरण शेतकरीविरोधी आहे हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. हा हंगामी अर्थसंकल्प असल्याने गेल्यावर्षी केलेल्या घोषणा पुर्ती झाली का सांगणे आवश्यक होते. त्याकड अर्थमंत्री यानी पुर्ण दुर्लक्ष केल आहे, असे शिवसेना ( उबाठा ) चे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी टीका केली.
गेल्यावर्षी शेतकरी कल्याण मंत्रालयाला सव्वा लाख कोटी रुपये दिले होते. पण उदिष्टपुर्ती बाबत मौन बाळगल्याने फक्त घोषणा करणारं सरकार अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.मागच्या घोषणांचा विसर तर पुढच्या घोषणाचा पाऊस अशी निराशाजनक अवस्था अर्थसंकल्पात दिसत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन देशातील जनतेला आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय एवढच दिसत आहे. सर्वच घटकांचा भ्रमनिरास केला असुन विशेष करून महाराष्ट्राची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे, असेही खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.
ना नवी दृष्टी ना नवे धोरण असा हा अर्थ “हीन संकल्प – आ. कैलास पाटील
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं देशातला शेतकरी संकटात आहे. कृषी क्षेत्रामध्ये अभुतपुर्व प्रतिकुल स्थिती आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा सरकार करतं उत्पन्न निम्म व उत्पादन खर्च चाैपट झाले आहे. सरकारच आयात-निर्यात धोरण याला कारणीभूत आहे. मग अशावेळी एक सक्षम धोरण जाहीर होणं आवश्यक होतं. मात्र सरकारच्या डोळ्यासमोर आता निवडणुका दिसत असल्याने शेतकर्यापेक्षा त्यांचे प्राधान्य वेगळ असल्याच दाखवुन दिल आहे. सरकार दरबारी फक्त जुमलेबाजी सुरु आहे तर दुसर्या बाजुला शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र सुरु आहे. वाढती महागाई, बेरोजगार तरुणांचे वाढते प्रमाण याकडेही सरकारन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मोजक्या उद्योगपतीचा फायदा करुन देणार सरकार, नव उद्योजकांना मात्र संकटात टाकत आहे. जीएसटीच प्रमाण कमी करण्याची मागणी छोटा व्यावसायिक करत असताना त्यातही बदल न केल्यानं सामान्य नागरीकांच्या खिशाची लागलेली कात्री तशीच राहणार आहे. नव्या अर्थसंकल्पातून या सर्व प्रश्नाची सोडवणुक करणे आवश्यक होतं. मात्र नवे धोरण नाही वा नव्या उपाययोजना नाहीत. हा अर्थसंकल्प म्हणजे ना दृष्टी ना धोरण असाच म्हणाव लागेल, असे शिवसेना ( उबाठा ) चे आ. कैलास पाटील यांनी टीका केली आहे.
शेतकरी वर्ग व सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून दिलासा नाही -डॉ प्रतापसिंह पाटील
येणाऱ्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी व आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी कुठलीही भरीव तरतूद नाही तसेच शेतकरी वर्ग जो आशा लावून बसला होता की हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे यामध्ये आपल्याला काहीतरी मिळेल त्यांची देखील मोदी सरकारने निराशा केली असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी काही चांगल्या योजना जाहीर केल्या असल्या तरी देखील शेतकरी वर्गाला काहीतरी या अर्थसंकल्पातून मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरली. तसेच इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे.तो स्लॅबदेखील सात लाखावर ठेवल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना देखील कराचा भुर्दंड बसणार आहे.त्यामुळे या अर्थसंकल्पातून शेतकरी,सर्वसामान्य व्यक्तींना दिलासा मिळालेला नाही.त्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालं आहे, असे डॉ प्रतापसिंह पाटील म्हणाले.